नक्षली भागात रस्त्यांसाठी १२ हजार कोटींची मागणी
By admin | Published: February 9, 2015 12:15 AM2015-02-09T00:15:24+5:302015-02-09T00:15:24+5:30
नक्षलग्रस्त भागात ७३०० कि.मी. लांब रस्ते बांधले जाणार असून, राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाला १२ हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची विनंती केली आहे.
नवी दिल्ली : नक्षलग्रस्त भागात ७३०० कि.मी. लांब रस्ते बांधले जाणार असून, राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाला १२ हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची विनंती केली आहे.
रस्ते आवश्यकता योजनेचा(आरआरपी)दुसरा टप्पा लवकरच सुरू केला जाणार असून विकास नसलेल्या भागात रस्ते पोहोचविले जातील, असे राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच म्हटले होते.
एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी महामार्ग मंत्रालयाला प्रचंड निधी गोळा करणे शक्य नसल्यामुळे गृह मंत्रालयाने वेगळी अर्थसंकल्पीय तरतूद करावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
गडकरी आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी अलीकडेच दिल्लीत या मुद्यावर चर्चा केली. झारखंडमध्ये नक्षलवादाचा प्रश्न सोडवायचा झाल्यास रस्ते बांधणे आवश्यक आहे, यावर चर्चेत भर देण्यात आला होता.