उत्तम समन्वयासाठी एनडीएमध्ये निमंत्रक नेमण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 01:54 AM2019-11-18T01:54:57+5:302019-11-18T01:55:20+5:30
घटक पक्षांत चिंतेचे वातावरण; मतभेदांचे निवारण करण्याचा हेतू
नवी दिल्ली : मतभेदांचे निवारण करण्यासाठी एनडीएमध्ये निमंत्रक नेमावा किंवा समन्वय समिती स्थापना करावी, अशी मागणी या आघाडीतील घटक पक्षांनी केली आहे. भाजपशी झालेल्या तीव्र मतभेदांनंतर शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली. त्या वादंगाचे सावट एनडीएच्या रविवारी झालेल्या बैठकीवर पडले होते.
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एनडीएमधील घटक पक्ष भलेही वेगवेगळ््या विचारसरणींचे असतील पण आपण एखाद्या मोठ्या कुटुंबासारखे आहोत. लहानसहान गोष्टींवरून आपापसात मतभेद होणे योग्य नाही.
या बैठकीनंतर मोदींनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, भारतातील विविधतेचे दर्शन एनडीएमध्ये घडते. देशातील शेतकरी, युवक, महिला, गरीबातील गरीब मनुष्य यांच्या कल्याणासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. संसदेचे हिवाळी अधिवेशन उद्या, सोमवारपासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर एनडीएची बैठक झाली.
लोक जनशक्ती पार्टीचे नवनिर्वाचित अध्यक्ष चिराग पासवान यांनी म्हटले आहे की, एनडीएमधील सर्वात जुन्या घटक पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेची अनुपस्थिती मला विशेषत्वाने जाणवली. सर्वात आधी तेलुगू देसमने एनडीएला रामराम केला. त्यानंतर राष्ट्रीय लोक समता पार्टीनेही तोच मार्ग पत्करला.
या सर्व गोष्टींची मला चिंता वाटते. एनडीएमधील घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय असता तर महाराष्ट्रात भाजप व शिवसेनेमधील वादंग टाळता आले असते. यापुढे असे प्रसंग टाळण्यासाठी एनडीएमध्ये निमंत्रक नेमावा किंवा समन्वय समितीची स्थापना करावी असेही पासवान म्हणाले. अशीच मागणी लोक जनशक्ती पार्टीप्रमाणेच अपना दल, जनता दल (यू) व ईशान्य भारतातील काही घटक पक्षांनीही एनडीएच्या बैठकीत केल्याचे सूत्रांनी सांगितले.