देशभरात हवी गोहत्या बंदी, सरसंघचालकांची मागणी
By admin | Published: April 9, 2017 05:43 PM2017-04-09T17:43:54+5:302017-04-09T18:17:46+5:30
गोहत्येविरोधात देशभरात एक कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - गोहत्येविरोधात देशभरात एक कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे. गोरक्षण झाले पाहिजे मात्र, त्यासाठी होणारा हिंसाचार चुकीचा असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं. भगवान महावीर जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
देशभरात गोहत्या थांबवणारा कायदा आम्हाला हवा आहे, कायद्याचं पालन करून गायींचं रक्षण करावं असं ते म्हणाले. राजस्थानमधील अलवारमध्ये कथित गोसंरक्षकांकडून ५५ वर्षीय डेअरी व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेनंतर भाजप आणि संघावर देशभरातून टीकेची झोड उठवण्यात आली होती.याच पार्श्वभूमीवर गोसंरक्षण करताना कायदा पाळण्याची गरज व्यक्त केली.
महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सरसंघचालकांनी गो-रक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या हिंसेचा विरोध केला. गोरक्षकांकडून होत असलेल्या हिंसेमुळे इतरांच्या प्रयत्नांवर पाणी फिरवले जात आहे. अनेक राज्यांमध्ये संघाची पार्श्वभूमी असलेले लोक सत्तेवर आहेत. त्याठिकाणी गो-रक्षणासाठी कायदे बनवण्यात आले आहेत. गो-रक्षणाचे काम हिंसेमुळे बदनाम होत असल्याचे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले.
ईशान्य भारत आणि केरळसारख्या राज्यांमधील भाजपाचे नेते बीफ खाण्याचं समर्थन करत असल्याने भाजपा दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.