डिझेल टॅक्सी बंदीसाठी मुदत हवी
By admin | Published: May 4, 2016 02:02 AM2016-05-04T02:02:28+5:302016-05-04T02:02:28+5:30
दिल्लीत डिझेल टॅक्सी बंद झाल्यामुळे दिल्लीकरांचे हाल सुरू असतानाच, टॅक्सीचालकांनी सलग दुसऱ्या दिवशीही रस्ते रोखून धरले. त्यामुळे दिल्लीत वाहतूक ठप्प झाली.
नवी दिल्ली : दिल्लीत डिझेल टॅक्सी बंद झाल्यामुळे दिल्लीकरांचे हाल सुरू असतानाच, टॅक्सीचालकांनी सलग दुसऱ्या दिवशीही रस्ते रोखून धरले. त्यामुळे दिल्लीत वाहतूक ठप्प झाली.
याची दखल घेत डिझेल टॅक्सीवर बंदी लागू करण्यासाठी मुदत देण्याची विनंती दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. या याचिकेत डिझेल टॅक्सीवर आणलेल्या बंदीमुळे निर्माण होणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच लोकांच्या गैरसोयीकडे लक्ष वेधले आहे. भाजपानेही हा मुद्दा लोकसभेत लावून धरत केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर आणि न्या. एफ.एम.आय. कलीफुल्ला यांनी बंदी कधी लागू केली जाणार त्याबाबतचा आराखडा सादर करण्याचे आदेश दिल्ली सरकारला दिले आहेत. बंदीमुळे निश्चितच लोकांची गैरसोय होणार आहे. बंदीबाबत काही सूचना किंवा शिफारशी सादर केल्या जात असतील तर बुधवारी त्यावर सुनावणी
केली जाईल, असे खंडपीठाने
म्हटले. (वृत्तसंस्था)
सुमारे ३० हजार डिझेल टॅक्सी थांबल्या...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दिल्लीत सुमारे ३० हजार डिझेल टॅक्सी धावत नसल्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दिल्ली सरकार प्रदूषण नियंत्रणासाठी कटिबद्ध असून न्यायालयाच्या आदेशाला विरोध केलेला नाही, मात्र अचानक निर्णय घेतल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, असे ज्येष्ठ वकील चंदर उदयसिंग यांनी स्पष्ट केले.
दिल्लीकर वैतागले... कॅबचालकांच्या आंदोलनामुळे दिल्लीकरांना मंगळवारी दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडीचा फटका बसला. आंदोलकांनी नोएडा आणि गुरगाव शहरांना जोडणारे रस्ते अडवून धरले. सकाळी कार्यालयांमध्ये जाणाऱ्यांना ‘ट्रॅफिक जाम’च्या वैतागाला सामोरे जावे लागले. त्यातच उन्हाचाही तडाखा वाढत होता.