शाळा ऑगस्टपासून सुरू करण्याची शिक्षणतज्ज्ञ, पालकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 05:16 AM2020-04-12T05:16:27+5:302020-04-12T05:16:35+5:30
बोर्डाच्या अन्य परीक्षांसाठी जून अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्याचा कालावधी लागू शकतो
बंगळुरू : २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आॅगस्टमध्ये करण्यात यावी, अशी मागणी शिक्षणतज्ज्ञ, खासगी शिक्षण संस्थांचे व्यवस्थापनांनी केली आहे. कोरोनाचे संकट जून अखेरपर्यंत संपले तरी, शाळा सुरू करण्यासाठी एक महिन्याचा अवधी हवा, असेही मत या वर्तुळातून व्यक्त होत आहे.
ते म्हणाले की, जुलैनंतरही प्राथमिक स्तरावर सर्व काही सुरळीत चालणे अवघड आहे. कारण, मुले हे संसर्गाबाबत अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे शैक्षणिक वर्ष आॅगस्टपासूनच सुरू करण्यात यावे. दिल्ली पब्लिक स्कूलचे बोर्ड मेंबर अली खान म्हणाले की, याचा परिणाम पुढील पूर्ण वर्षभर होऊ शकतो. ३१ मेपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर सरकारला पुढे ढकललेल्या परीक्षा घ्यायच्या आहेत. यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागेल.
बोर्डाच्या अन्य परीक्षांसाठी जून अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्याचा कालावधी लागू शकतो. जरी सरकारने लॉकडाऊन हटविले तरी, अनेक पालक विद्यार्थ्यांना पाठवतील काय? हा प्रश्न आहे. अनेक पालकांचे म्हणणे आहे की, मुलांची सुरक्षा आणि आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण मुलाला सप्टेंबरपासूनच शाळेत पाठवू. आम्ही जागतिक संकटाचा सामना करीत आहोत. काही तडजोडी कराव्याच लागतील.
प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या व्यवस्थापन समितीचे सरचिटणीस डी. शशी म्हणाले की, शाळा व्यवस्थापनांचे असे म्हणणे आहे की, परिस्थिती पूर्वपदावर आली तरी पाठ्यपुस्तके, ड्रेस आणि अन्य तयारीसाठी एक महिन्याचा कालावधी हवा. सध्या विद्यार्थ्यांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. जरी सरकारने लॉकडाऊन हटविले तरी, शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी सुरक्षेबाबत विचार करण्याची गरज आहे.