अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राची तरतूद वाढविण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 04:12 AM2019-01-31T04:12:39+5:302019-01-31T04:13:32+5:30
पाकिस्तान व चीनच्या तुलनेत भारताची तरतूद कमी असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : शुक्रवारी १ फेब्रुवारी रोजी सादर होत असलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राची आर्थिक तरतूद वाढविण्याची आग्रही मागणी या क्षेत्रातील जाणकारांनी केली आहे. पाकिस्तान व चीनच्या तुलनेत भारताची तरतूद कमी असल्याचेही जाणकारांनी म्हटले आहे.
संरक्षण विश्लेषक स्वर्ण सिंग म्हणाले की, देशाच्या संरक्षणसिद्धतेसाठी केल्या जाणाऱ्या एकूण तरतुदीकडे नेहमीच शेजारच्या राष्ट्रांच्या तुलनेत पाहिले जाते. गेल्यावर्षी पाकिस्तानची संरक्षण तरतूद १८ टक्क्यांनी वाढली होती. भारताची तरतूद मात्र अवघ्या ५.५ टक्क्यांनी वाढली. ही बाब चिंताजनक मानली जात आहे. याशिवाय चीनची संरक्षण तरतूद भारतापेक्षा तिप्पट जास्त आहे.
संरक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण गरजेचे
संरक्षणतज्ज्ञ एस.के. चटर्जी म्हणाले की, भारताच्या सुरक्षेला असलेला गंभीर धोका लक्षात घेऊन संरक्षणविषयक तरतूद असायला हवी. आपल्या संरक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी पुरेसा निधी मिळत नाही. उलट चीन आपल्या संरक्षण व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण करीत आहेत.