भाजप नेत्याच्या मृत्युप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी, याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 05:34 AM2023-07-17T05:34:15+5:302023-07-17T05:34:51+5:30
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
नवी दिल्ली : एक तर सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे किंवा पाटणा येथे १३ जुलै रोजी घडलेल्या घटनेच्या तपासासाठी सीबीआयला निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या दिवशी नितीशकुमार सरकारच्या विरोधात मोर्चा काढताना एका भाजप नेत्याचा मृत्यू झाला.
जहानाबाद जिल्ह्यातील पक्षाचे नेते विजय सिंह यांचा विधानसभेवरील मोर्चामध्ये सहभागी असताना, पोलिसांच्या लाठीमारात मृत्यू झाल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे, तर पाटणा जिल्हा प्रशासनाने त्यांच्या शरीरावर कोणत्याही दुखापतीच्या खुणा आढळल्या नाहीत, असे सांगून जबाबदारी झटकली आहे. भूपेश नारायण यांनी याचिका दाखल केली आहे.
काय घडले हाेते?
राज्य सरकारच्या शिक्षक भरती धोरणाविरोधातील आंदोलनाच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या विधानसभा मोर्चाची सुरुवात पाटणाच्या गांधी मैदानापासून झाली होती आणि विधानसभेच्या आवारापासून काही अंतरावर तो रोखण्यात आला होता. त्यावेळी पाेलिसांनी लाठीमार केला हाेता.