हिंदू महासभेने केली 'या' शहराला नथुराम गोडसेचे नाव देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 08:24 PM2018-11-15T20:24:01+5:302018-11-15T20:25:06+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इलाहाबाद आणि फैझाबाद या शहरांचे नामांतर केल्यानंतर देशभरात नामांतराची लाट आली आहे.
मीरत - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इलाहाबाद आणि फैझाबाद या शहरांचे नामांतर केल्यानंतर देशभरात नामांतराची लाट आली आहे. त्यावरून वाद-प्रतिवादही होत आहेत. दरम्यान, आता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे नाव मेरठ शहराला देण्याची मागणी हिंदू महासभेने केली आहे. या मागणीमुळे राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
हिंदू महासभेने गुरुवारी नथुराम गोडसे आणि नाना आपटे यांचा मृत्यूदिन साजरा केला. यावेळी नथुराम गोडसे हा महान पत्रकार आणि विचारवंत असल्याचा दावा हिंदू महासभेने केला. तसेच मेरठ शहराला नथुराम गोडसेचे नाव देण्याची मागणीही केली. तसेच गाझियाबादला दिग्विजयनगर आणि हापुडला महंत अवैद्यनाथ नाव देण्याची मागणी हिंदू महासभेकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. तसेच इलाहाबादचे प्रयागराज असे नामांतर केल्याबद्दल योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
योगी आदित्यनाथ यांनी इलाहाबादचे प्रयाग असे नामांतर केल्यापासून देशात नामांतरावरून वाद-विवाद सुरू झाले आहेत. आता अहमदाबादचे नाव कर्णावती करण्यासाठी गुजरातमध्ये प्रयत्न सुरू झाले आहेत. तर महाराष्ट्रात औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर पुण्याचेही जिजापूर असे नामांतर करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.