जेएनयूमधील हल्ल्याचे पुरावे जतन करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 02:37 AM2020-01-14T02:37:38+5:302020-01-14T02:37:54+5:30
विद्यापीठातील सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज महत्त्वाचे पुरावे असल्याने त्यांचे जतन करण्याचा आदेश द्यावा
नवी दिल्ली : ‘युनिटी अगेन्स्ट लेफ्ट’ अणि ‘फ्रेण्डस आॅफ आरएसएस’ या दोन व्हॉट््सअॅप ग्रुपवर संदेशांची देवाणघेवाण करून गेल्या आठवड्यात जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (जेएनयू) कॅम्पसमध्ये घुसून बुरखाधारी गुंडांनी विद्यार्थी व अध्यापकांवर हिंसक हल्ला केला, असा आरोप करणारी व व्हॉट््सअॅप संदेशांसह विद्यापीठातील सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज महत्त्वाचे पुरावे असल्याने त्यांचे जतन करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
अमित परमेश्वरन, अतुल सूद व शुक्ला विनायक सावंत या ‘जेएनयू’मधील प्राध्यापकांनी ही याचिका केली आहे. न्या. ब्रिजेश सेठी यांनी या याचिकेवर व्हॉट््सअॅप, गूगल व अॅपल या कंपन्यांना नोटीस काढून सविस्तर सुनावणी मंगळवारी ठेवली.
दिल्ली पोलिसांचे वकील राहुल मेहरा यांनी न्यायालयास सांगितले की, विद्यापीठ कॅम्पसमध्ये बसविलेल्या ११३ सीसीटीव्हींचे ३ ते ६ जानेवारी दरम्यानचे सर्व फूटेज तपासासाठी उपलब्ध करून देण्यासाठी पोलिसांनी जेएनयू प्रशासनास पत्र लिहिले आहे. पण त्यावर त्यांच्याकडून उत्तर आलेले नाही. दोन आरोपित व्हॉट््सअॅप ग्रुपच्या संदर्भातही पोलिसांनी त्या कंपनीकडून माहिती मागविली आहे, असेही त्यांनी सांगितले.