शबनमची फाशी थांबवण्याची मागणी; महंत परमहंस दास म्हणाले, "महिलेला फाशी दिली तर..."
By पूनम अपराज | Published: February 22, 2021 01:53 PM2021-02-22T13:53:47+5:302021-02-22T14:33:05+5:30
Amroha Murder Case : दुसरीकडे महंत परमहंस दास यांनी देखील राष्ट्रपतींना शबनमची फाशीची शिक्षा माफ करण्यासाठी आवाहन केले आहे.
प्रेमासाठी शिक्षिका असलेल्या शबनमने घरातीलच ७ लोकांची क्रूरपणे हत्या केली होती. कारण हे तिच्या घरातील लोक तिच्या प्रेमाच्या विरोधात होते. ती सलीम नावाच्या एका आठवी पास तरूणावर प्रेम करत होती.यूपीतील अमरोहा येथील बहुचर्चीत हत्याकांडातील दोषी शबनमच्या डेथ वॉरन्टवर कोणत्याही क्षणी हस्ताक्षर होऊ शकतात. लवकरच शबनमला मथुरा येथील तुरूंगात फासावर लटकवलं जाऊ शकतं. मात्र, अशातच शबनमचा मुलगा ताजने देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या आईची फाशीची शिक्षा माफ करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे महंत परमहंस दास यांनी देखील राष्ट्रपतींना शबनमची फाशीची शिक्षा माफ करण्यासाठी आवाहन केले आहे.
अयोध्या येथील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना शबनमची फाशीची शिक्षा माफ करण्याचे आवाहन केले आहे. जर शबनमला फाशी देण्यात आली तर स्वातंत्र्यानंतर महिलेला फाशी देण्याची ही पहिलीच घटना असेल. महंत परमहंस दास यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, 'हिंदू धर्मग्रंथात स्त्रीला पुरुषांपेक्षा खूपच महत्वाचे स्थान दिले आहे. स्त्रीच्या मृत्यूचा फायदा समाजाला होणार नाही, तर दुर्दैवी आणि आपत्तींना निमंत्रण द्याल. तिचा गुन्हा माफ करण्यायोग्य नाही, परंतु स्त्री म्हणून तिला क्षमा केले पाहिजे हे खरे आहे.
'महिलेला फाशी देणे दुर्भाग्यपूर्ण'
महंत पुढे म्हणाले, 'हिंदू धर्माचे गुरू असल्याने मी राष्ट्रपतींना शबनम यांची दया याचिका स्वीकारण्याचे आवाहन करतो. तुरुंगात तिच्या गुन्ह्याबद्दल तिने प्रायश्चित भोगले आहे. जर तिला फाशी देण्यात आली तर, हा इतिहासातील सर्वात दुर्भाग्यपूर्ण अध्याय असेल. आमची राज्यघटना राष्ट्रपतींना विलक्षण अधिकार देते, त्यांनी या अधिकारांचा उपयोग माफी देण्यासाठी करायला हवा. '
कुटुंबातील ७ सदस्यांची हत्या केली होती
यूपीतील अमरोहा जिल्ह्यात १४ - १५ एप्रिल २००८ साली शबनमने प्रियकर सलीम याच्या मदतीने आपल्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केली होती. शबनम आणि सलीमला फाशी देण्यात येईल. जुलै 2019 पासून हे दोघे शबनम रामपूर तुरूंगात आहे.