दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 05:17 PM2019-10-23T17:17:02+5:302019-10-23T17:17:25+5:30
दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज दिल्लीत केली.
नवी दिल्ली : दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज दिल्लीत केली.
दिल्लीत जनता दल (यूनायटेड) पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिल्लीला पूर्ण राज्याच्या दर्जाचा मुद्या उपस्थित केला. आप पार्टीने या मागणीचा पाठपुरावा केला होता परंतु लोकसभा निवडणुकीनंतर हा मुद्दा आपने मागे ठेऊन विकासाच्या मुद्याला अधिक प्राधान्य दिले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मात्र हा मुद्या पुन्हा ऐरणीवर आणला आहे. मोदी सरकारने दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी यापूर्वीच फेटाळून लावली आहे.
नितीशकुमार यांनी बिहारला विशेष दर्जा देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. ज्याप्रमाणे बिहारला विशेष दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करीत आहोत. त्याप्रमाणे दिल्लीला सुद्धा पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी पक्षाची असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे बिहारमध्ये जदयूसोबत भाजप सत्तेत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत जदयू सर्व ७० जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.