भिका-यांवर नोटाबंदी! इवांका ट्रम्पच्या भारत दौ-याआधी या शहरात भीक मागण्यास बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 05:25 PM2017-11-08T17:25:01+5:302017-11-08T18:42:11+5:30
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प हैदराबादच्या दौ-यावर येणार आहे. इवांका ट्रम्पचा हैदराबाद दौरा लक्षात घेऊन येथे शहरात भिका-यांना भीक मागण्यास काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
हैदराबाद: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प हैदराबादच्या दौ-यावर येणार आहे. इवांका ट्रम्पचा हैदराबाद दौरा लक्षात घेऊन येथे शहरात भिका-यांना भीक मागण्यास काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या दौ-यादरम्यान हैदराबादमध्ये भिका-यांना भीक मागता येणार नाही. बुधवारी (दि.8) सकाळी 6 वाजेपासून ते 7 जानेवारी 2018 पर्यंत ही बंदी असणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, नाक्यावर भीक मागणं किंवा लहान मुलांना अथवा अपंग व्यक्तींना भीक मागण्यास भाग पाडणं हा गुन्हा ठरेल. या आदेशाचं उल्लंघन करणा-याला दंड ठोठावला जाईल असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.
यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्या हैदराबाद दौ-यावेळीही अशाच प्रकारे भीक मागण्यास बंदी घातली होती.
इवांका ट्रम्प 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान हैदराबादमध्ये होणा-या जागतिक उद्योजगता परिषदेत सहभागी होण्यासाठी येणार आहे. त्यानंतर शहरात विश्व तेलगू संमेलन सुरू होईल. हे संमेलन 5 दिवसांसाठी असणार आहे. यामध्ये हजारो तेलगू एनआरआय सहभागी होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या वेळी इवांका ट्रम्प यांना जागतिक उद्योजगता परिषदेचं नेतृत्व भारतात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्याच निमंत्रणानुसार इवांका ट्रम्प भारतात येणार आहेत. हैदराबादमध्ये ही परिषद होणार आहे.