नोटाबंदी: 'त्या' 80 हजार व्यक्ती रडारवर; बेहिशोबी रोकड बँकेत भरणं महागात पडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 08:29 AM2018-11-15T08:29:44+5:302018-11-15T08:31:48+5:30
वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न देणारे आयकर विभागाच्या स्कॅनरखाली
मुंबई: नोटाबंदीनंतर बेहिशोबी रक्कम बँकेत भरणाऱ्या 80 हजार व्यक्ती आयकर विभागाच्या रडारवर आहेत. या व्यक्तींनी नोटाबंदीनंतर बँकेत भरलेली रक्कम त्यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक असल्याचं तपासातून समोर आलं आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डचे चेअरमन सुशील चंद्रा यांनी ही माहिती दिली.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली. यानंतर जुन्या नोटा बदलण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. यानंतर 23 लाखांहून अधिक लोकांनी बँकेत जमा केलेली रक्कम संशयास्पद होती. या व्यक्तींचं उत्पन्न आणि त्यांनी बँकेत जमा केलेली रक्कम यात काळंबेरं असल्याचा संशय आयकर विभागाला होता. त्यामुळे या सर्व व्यक्तींना आयकर भरणा करुन विभागाच्या प्रश्नांना उत्तरं देण्याची सूचना करण्यात आली.
उत्पन्नापेक्षा अधिक रक्कम बँकेत जमा करणाऱ्या तब्बल 23 लाख लोकांशी आयकर विभागानं पत्रव्यवहार केला. मात्र यातील 3 लाख लोकांनी आयकर भरणा केला नाही. यानंतर आयकर विभागानं या व्यक्तींशी पुन्हा एकदा संपर्क साधला. यावेळी आयकर विभागाला 3 लाखपैकी 2.15 व्यक्तींना प्रतिसाद दिला. मात्र अद्यापही 80 हजार व्यक्तींनी आयकर विभागाच्या पत्रांना उत्तरं दिलेली नाहीत. या व्यक्ती आता आयकर विभागाच्या रडारवर असणार आहेत.