विरोधकांची VVPATसंबंधीची मागणी आयोगानं फेटाळली, दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर प्रदर्शनं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 01:39 PM2019-05-22T13:39:28+5:302019-05-22T13:39:35+5:30
ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगानं घेतलेल्या बैठकीदरम्यान काही लोकांनी विरोध प्रदर्शन केलं आहे.
नवी दिल्लीः ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगानं घेतलेल्या बैठकीदरम्यान काही लोकांनी विरोध प्रदर्शन केलं आहे. निवडणूक आयोगाची दिल्लीत बैठक सुरू असतानाच बाहेर विरोध प्रदर्शन केलं जातं आहे. काही लोकांनी दिल्लीत पोस्टर आणि बॅनर फडकावून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणबाजी केली. मंगळवारी प्रमुख 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसंबंधी काही मागण्या केल्या होत्या. विरोधी पक्षांच्या त्याच मागण्यांवर निवडणूक आयोगानं आज बैठक घेतली होती. त्याच दरम्यान हे विरोध प्रदर्शन करण्यात आलं आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोगानं विरोधकांची मागणी फेटाळून लावली आहे. मत पत्रिका आणायची नसल्यास निवडणूक निकालांवेळी व्हीव्हीपॅटच्या मतांची आणि ईव्हीएममधील किमान 50 टक्के मतांची पडताळणी करावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ गेले होते. या नेत्यांनी निवडणूक आयुक्तांना सांगितले की, देशभरामध्ये ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यावर निवडणूक आयोगाने संमती दर्शवत या मुद्द्यावर विचार केला जाईल, असे आश्वासन दिले होते. अखेर विरोधकांची ही मागणी निवडणूक आयोगानं फेटाळून लावली आहे.
22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी 21 मे रोजी ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. त्यात ईव्हीएममधल्या छेडछाडीचा उल्लेख करण्यात आला आहे. विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट यंत्रातील पावत्या मोजण्याची अनुमती दिली सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. तरीही ते मतमोजणीच्या आधी व्हाव्यात, अशीही विरोधकांची मागणी आहे. 19 मे रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर देशभरातल्या अनेक भागात ईव्हीएमबरोबर छेडछाड केल्याचं वृत्त आलं होतं.
Election Commission rejects demands of opposition parties' regarding VVPAT. More details awaited pic.twitter.com/zyxETDjWOE
— ANI (@ANI) May 22, 2019
तसेच स्ट्राँग रुमच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्याच मुद्द्यावर विरोधकांनी ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. येत्या २३ तारखेला प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील 30 मतदान केंद्रांतील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणेतील पावत्यांच्या बेरजेची पडताळणी होणार आहे. व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची मोजणी हाताने केली जाणार असल्याने त्यासाठी विलंब लागण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार एका व्हीव्हीपॅटमधील पावत्या मोजण्यास किमान एक तास लागू शकतो. या अनुमानानुसार पाच मतदारसंघातील व्हीव्हीपॅटमधील पावत्यांच्या गणनेसाठी किमान तीन ते चार तासांचा अवधी लागू शकतो. त्यामुळे दुपारनंतर कल समजू लागले, तरी अंतिम आकडेवारी रात्री दहा वाजल्यानंतरच कळू शकेल, असा निवडणूक अधिका-यांचा अंदाज आहे.
बँकेतील कॅशियरप्रमाणे केबिन
व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची मोजणी हाताने केली जाणार असल्यामुळे ही मते मोजणा-या अधिका-यांसाठी मतमोजणी केंद्रावर बँकेतील कॅशियरप्रमाणे केबिनची व्यवस्था केली जाणार आहे. पावत्या गहाळ होऊ नयेत, यासाठी मत मोजणा-या अधिका-यावर त्याच्या वरिष्ठ अधिका-याचे बारीक लक्ष असेल. या व्यतिरिक्त १३ लाख सरकारी नोकरांनी इलेक्ट्रॉनिक पोस्टल बॅलेट सिस्टीमद्वारे मतदानाचा हक्क बजावला असल्याने त्या मतांची गणना करतानाही बराच वेळ लागेल.