दिल्लीत डेंग्यू, चिकनगुनियाचे थैमान सुरुच
By Admin | Published: September 16, 2016 01:29 AM2016-09-16T01:29:25+5:302016-09-16T01:29:25+5:30
राजधानी दिल्लीत डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांनी थैमान घातले आहे. दिल्लीत जवळपास ११५० लोकांना डेंग्यूची लागण झाली असून या महिन्यात आणखी ५ रुग्णांचा एम्स रुग्णालयात मृत्यू झाला
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांनी थैमान घातले आहे. दिल्लीत जवळपास ११५० लोकांना डेंग्यूची लागण झाली असून या महिन्यात आणखी ५ रुग्णांचा एम्स रुग्णालयात मृत्यू झाला. याबरोबरच या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून १४ झाली. १ ते १३ सप्टेंबर या काळात डेंग्यूचे पाच रुग्ण दगावले, अशी माहिती एम्सच्या सूत्रांनी दिली.
एम्समध्ये दररोज डेंग्यूचे नवीन रुग्ण दाखल होत आहेत. तथापि चिकनगुनियाच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी आहे. १३ सप्टेंबरपर्यंत १४४० जणांना डेंग्यू झाल्याचे निदान करण्यात आले. गेल्या दहा दिवसांत डेंग्यूचे ३९० रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत.
दरम्यान चिकनगुनियाने एका ७५ वर्षीय रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाला. त्याबरोबरच चिकनगुनियाने दगावलेल्यांची संख्या १२ वर पोहोचली. जे. डी. मदान असे मृताचे नाव आहे. सर गंगाराम रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.