Dengue Fever: मोठी बातमी! शास्त्रज्ञांना सापडले डेंग्यूचे औषध, लवकरच 20 केंद्रांवर होणार चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 10:10 AM2021-10-20T10:10:43+5:302021-10-20T10:11:03+5:30
Dengue Fever: डेंग्यू हा एक विषाणूजन्य ताप आहे, ज्यामध्ये पीडित व्यक्तीला असह्य वेदना होतात आणि स्थिती गंभीर झाल्यावर मृत्यूदेखील होऊ शकतो. आतापर्यंत फक्त लक्षणांच्या आधारेच यावर उपचार केले जायचे.
नवी दिल्ली: मागील काही दिवसांमध्ये डेंग्यूची (Dengue Fever) साथ सुरू झाली आहे. या डेंग्यूवर कुठलाही उपचार नाही, फक्त लक्षणांच्या आधारार उपचार केला जातो. पण, आता डेंग्यूच्या उपचारात शास्त्रज्ञांना मोठं यश मिळालं आहे. सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट, लखनऊच्या शास्त्रज्ञांनी डेंग्यूवर औषध तयार केलं आहे. लवकरच या औषधाचा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपयोग केला जाईल.
डेंग्यू हा विषाणूजन्य ताप आहे, ज्यामध्ये पीडित व्यक्तीला असह्य वेदना होतात आणि स्थिती गंभीर झाली तर मृत्यू देखील होऊ शकतो. डेंग्यूला हाडतापदेखील म्हणतात. कारण, डेंग्यूमध्ये रुग्णाच्या हाडांमध्ये तीव्र वेदना होतात. आतापर्यंत डेंग्यूवर कोणताही इलाज नाही. लक्षणांच्या आधारे त्यावर उपचार केले जातात, पण आता शास्त्रज्ञांना त्याचे उपचार सापडले आहेत.
औषधाची क्लिनिकल चाचणी सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच डेंग्यूच्या औषधांची क्लिनिकल ट्रायल सुरू केल्या जाणार आहेत. हे औषध देशातील 20 केंद्रांवर 10 हजार डेंग्यू रुग्णांना दिले जाईल. प्रत्येक केंद्रावर 100 रुग्णांना ट्रायलमध्ये ठेवण्यात येईल आणि त्यांना हे औषध देण्यात येईल. मुंबईतील एका मोठ्या औषध कंपनीने हे औषध तयार केले आहे.
अँटी व्हायरल औषध
शास्त्रज्ञांच्या मते, डेंग्यूचे हे औषध वनस्पतींवर आधारित आहे. त्याला 'क्युक्युलस हिरसूटसचे शुद्धीकृत जलीय अर्क'(AQCH) असे म्हटले जात आहे. हे अँटी व्हायरल औषध असून औषधाचे उंदीरांवरील प्रयोग यशस्वी झाले आहेत. कंपनीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) कडून मानवी चाचण्यांसाठी परवानगीही मिळाली आहे.
या ठिकाणी चाचणी केली जाईल
देशातील 20 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये डेंग्यूच्या औषधाच्या चाचणीसाठी तयारी केली जात आहे. यामध्ये कानपूर, लखनऊ, आग्रा, मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, अहमदाबाद, कोलकाता, बंगळुरू, मंगलोर, बेळगाव, चेन्नई, चंदीगड, जयपूर, विशाखापट्टणम, कटक, खुर्दा, जयपूर आणि नथवाडा यांचा समावेश आहे. या चाचण्यांमध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांना घेतले जाईल. चाचणीसाठी रुग्णाला आठ दिवस रुग्णालयात ठेवले जाईल आणि सात दिवस औषधांचा डोस दिला जाईल. उपचारानंतर 17 दिवसांपर्यंत रुग्णाला निरीक्षणाखाली ठेवले जाईल.