कोरोनासोबत दिल्लीकरांवर आता डेंग्यूचे सावट; यंत्रणेवरील ताण वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 12:44 AM2020-12-03T00:44:29+5:302020-12-03T00:44:44+5:30
नोव्हेंबरमध्ये २०० रुग्ण, राज्य सरकारने डेंग्यू, मलेरिया रुग्णांची माहिती देण्यासाठी अंतर्गत डॅशबोर्ड तयार केला आहे.
नवी दिल्ली : कोरोनापाठोपाठ दिल्लीकरांवरडेंग्यूचे संकट घोंघावू लागले आहे. नोव्हेंबर संपताना दिल्लीत दोनशेपेक्षा जास्त डेंग्यू रुग्णांची नोंद झाली. या आठवड्यात ४९ तर त्याआधी ८० रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणांंवरही दबाव वाढला आहे. राज्य सरकार, तीनही महानगरपालिकांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. डासांपासून होणारा आजार रोखताना कोरोनाशीदेखील लढण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. दिल्ली महापालिकेच्या दाव्यानुसार गेल्या काही महिन्यांमध्ये ९५० डेंग्यू रुग्णांची नोंद झाली.
दिवाळीनंतर कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली. दररोज सहा हजारांपेक्षाही जास्त रुग्ण आढळले. रोज शंभरपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत होता. आता डेंग्यू रुग्णांची त्यात भर पडली.डेंग्यू रुग्ण वाढत असताना मलेरिया रुग्णांमध्ये घट दिसली. गेल्या आठवड्यात एका जणाला मलेरिया झाला होता. त्याआधी ऑक्टोबर महिन्यात मलेरियाचा रुग्ण आढळला नाही.
राज्य सरकारने डेंग्यू, मलेरिया रुग्णांची माहिती देण्यासाठी अंतर्गत डॅशबोर्ड तयार केला आहे. त्यावर रुग्णांची नोंद केली जाते.
नवी दिल्ली, दिल्ली महानगरपालिकेकडून तशी माहिती पुरविली जाते. डेंग्यू, मलेरियाची चाचणी करण्यासाठी सुसज्ज यंत्रणा सर्वच सरकारी रुग्णालयांमध्ये असली तरी कोरोनामुळे त्यावरही मोठा ताण आहे. कोरोनाचा प्रसार रोखताना डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी महानगरपालिकांना केले आहे.
कचऱ्याच्या बदल्यात मास्क
एनडीएमसी महापालिकेने अभिनव उपक्रम सुरू केला. ज्यात प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात मास्क मिळेल. मुख्य सचिव विजय देव यांच्या उपस्थितीत कनाॅट प्लेसमध्ये हे अभियान सुरू झाले. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे (यूनडीपी) त्यासाठी सहकार्य मिळाले आहे.