डेंग्यूचा विषाणू पहिल्यापेक्षा अधिक शक्तिशाली; शास्त्रज्ञ म्हणतात, विनाविलंब लस हवी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 08:44 AM2023-05-03T08:44:25+5:302023-05-03T08:44:36+5:30
लोकांना कधी कधी एका सेरोटाइपने संसर्ग होऊ शकतो आणि नंतर वेगळ्या सेरोटाइपचा दुय्यम संसर्ग होऊ शकतो.
बंगळुरू : कोरोनाशी लढाई सुरू असतानाच अनेक जुने रोगही उचल खात आहेत. त्यातच आता भारतातील डेंग्यू विषाणू प्रचंड प्रमाणात विकसित झाल्याचे येथील भारतीय विज्ञान संस्थेच्या (आयआयएससी) संशोधकांनी उघड केल्यामुळे खळबळ उडाली आहे. सहा दशकांतील विषाणूतील संगणकीय विश्लेषणाचा भाग म्हणून नवीन तपशील उघड करण्यात आले आहेत.
अभ्यासात आढळून आले की, डासांमुळे होणाऱ्या या विषाणूजन्य आजाराचे रुग्ण गेल्या ५० वर्षांमध्ये, प्रामुख्याने दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये सातत्याने वाढत गेले आहेत. इतर देशांमध्ये डेंग्यूवर लस विकसित केल्या गेल्या आहेत; परंतु भारताकडे डेंग्यू विरुद्ध मान्यताप्राप्त लस नाही.
आयआयएससीचे रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी प्राध्यापक राहुल रॉय, ‘आम्ही डेंग्यूचे भारतातील वेगवेगळ्या रूपांबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. आम्हाला आढळले की, ते लस विकसित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मूळ प्रकारांपेक्षा खूप वेगळे आहेत. डेंग्यू विषाणूच्या (डेंग्यू १, २, ३ आणि ४) चार व्यापक सेरोटाइप आहेत. संगणकीय विश्लेषणाचा वापर करून, संशोधकांच्या पथकाने तपासले असता त्यांना आढळले की त्यांची रचना खूप गुंतागुंतीची झाली आहे.’
एकाच वेळी संसर्गाने गंभीर परिस्थिती
लोकांना कधी कधी एका सेरोटाइपने संसर्ग होऊ शकतो आणि नंतर वेगळ्या सेरोटाइपचा दुय्यम संसर्ग होऊ शकतो, ज्यामुळे अधिक गंभीर लक्षणे उद्भवू शकतात, असे आयआयएससीचे संशोधक विद्यार्थी सूरज जगताप म्हणतात.
डेंग्यू-२ देशभरात प्रबळ
२०१२ पर्यंत, भारतात डेंग्यू-१ आणि डेंग्यू-३ हे प्रमुख प्रकार होते. अलीकडच्या वर्षांत, संशोधकांना असे आढळून आले आहे की डेंग्यू-२ संपूर्ण देशभरात अधिक प्रबळ झाला आहे, तर डेंग्यू-४, जो एकेकाळी सर्वांत कमी संसर्गजन्य मानला जात होता, तो आता दक्षिण भारतात जोर धरत आहे. विशिष्ट कालावधीत विषाणूचे विशिष्ट स्वरूप प्रबळ करणारे कोणते घटक आहेत, हे शोधण्याचा संशोधक प्रयत्न करत आहेत. एक संभाव्य घटक प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) आधारित वाढ (एडीई) असू शकतो.