नवी दिल्लीत डेंग्यूचा कहर
By admin | Published: September 16, 2015 02:22 AM2015-09-16T02:22:02+5:302015-09-16T02:22:02+5:30
येथे मागील आठवड्यात सात वर्षांच्या मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतर आणखी एका सहा वर्षांच्या मुलाचा व २९ वर्षीय महिलेचा डेंग्यूने बळी घेतल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ११ वर पोहोचली आहे.
नवी दिल्ली : येथे मागील आठवड्यात सात वर्षांच्या मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतर आणखी एका सहा वर्षांच्या मुलाचा व २९ वर्षीय महिलेचा डेंग्यूने बळी घेतल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ११ वर पोहोचली आहे.
श्रीनिवासपुरी भागातील अमन शर्मा या मुलाचा व एका महिलेचा मंगळवारी मृत्यू झाल्याने डेंग्यूचे संकट गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हॉस्पिटल्सना इशारा दिला आहे की, जे हॉस्पिटल डेंग्यूचा रुग्ण दाखल करून घेणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. केजरीवाल यांनी दोन हॉस्पिटलमध्ये अचानक भेट देऊन पाहणी केली. डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार न करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्ली सरकारला केल्या आहेत. आतापर्यंत डेंग्यूचे दोन हजार संशयित रुग्ण तपासणीसाठी दाखल झाले आहेत.
‘त्या’ कुटुंबाला मदत
अविनाश या मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतर या मुलाचे आई-वडील लक्ष्मण राऊत आणि बबिता यांनी आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर आज ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पीडित परिवाराला तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मुलाच्या मृत्यूची दंडाधिकाऱ्यामार्फत चौकशी
अविनाश राऊत या सात वर्षीय मुलाला डेंग्यू झाल्यानंतर पाच रुग्णालयांनी त्याला दाखल करवून न घेतल्याप्रकरणी दिल्ली सरकारने दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत, असे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी स्पष्ट केले.
मूलचंद, मॅक्स साकेत, साकेत सिटी, आकाश आणि आयरीन या पाच रुग्णालयांना या मुलाला दाखल करवून न घेतल्याबद्दल तुमच्या रुग्णालयाची नोंदणी रद्द का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटिस बजावली आहे.
८ सप्टेंबर रोजी अविनाशचा मृत्यू झाल्यानंतर दु:खावेग सहन न झाल्यामुळे त्याच्या मातापित्यांनी दक्षिण दिल्लीच्या लाडो सराय या चार मजली इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली होती.