शारीरिक संबंधांना नकार देणे हे मानसिक क्रौर्यच, उच्च न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 06:34 AM2024-01-17T06:34:38+5:302024-01-17T06:34:54+5:30

घटस्फोटासाठी हे वैध कारण आहे, असे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Denial of physical relations is mental cruelty, High Court approves divorce | शारीरिक संबंधांना नकार देणे हे मानसिक क्रौर्यच, उच्च न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट

शारीरिक संबंधांना नकार देणे हे मानसिक क्रौर्यच, उच्च न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट

जबलपूर (मध्य प्रदेश) : लग्नानंतर लग्नाची कर्तव्ये पार न पाडणे आणि शारीरिक संबंधांना नकार देणे हे मानसिक क्रौर्यच आहे. घटस्फोटासाठी हे वैध कारण आहे, असे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

पत्नीने लग्नाची पूर्तता करण्यास नकार दिला आणि २००६ मध्ये लग्न झाल्यापासून शारीरिक जवळीक नाकारली, या कारणास्तव न्यायमूर्ती शील नागू आणि न्यायमूर्ती विनय सराफ यांच्या खंडपीठाने ३ जानेवारी रोजी एका पुरुषाला घटस्फोट मंजूर केला. “विवाहपूर्ती न करणे आणि शारीरिक जवळीक नाकारणे म्हणजे मानसिक क्रूरता आहे,” असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

२०११ मध्ये, त्या व्यक्तीने घटस्फोटासाठी भोपाळमधील कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. २०१४ मध्ये कौटुंबिक न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे की, अनेक प्रसंगी महिलेने लग्नपूर्ती करण्यास आणि तिच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. कोणत्याही शारीरिक अक्षमतेशिवाय किंवा वैध कारणाशिवाय एकतर्फी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देणे हे मानसिक क्रूरता ठरू शकते.

कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द करताना उच्च न्यायालयाने म्हटले की, पत्नीने लग्नाची कर्तव्ये पार न पाडणे  हे घटस्फोटाचे कारण असू शकत नाही, हा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश चुकीचा आहे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. 

पत्नी म्हणाली, माझे प्रियकरासोबत लग्न लावून द्या... 
पुरुषाने दाखल केलेल्या अपिलानुसार, जुलै २००६ मध्ये त्याचे लग्न झाले. तथापि, त्याच्या पत्नीने आपले लग्न बळजबरीने लावले गेले, असा दावा करीत त्याच्यासोबत राहण्यास आणि लग्नपूर्ती करण्यास नकार दिला.
आपले दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे, असे सांगत पत्नीने त्यांना एकत्र आणण्याची विनंती पतीकडे केली. 
त्यानंतर पती त्याच महिन्यात कामासाठी अमेरिकेला निघून गेला आणि सप्टेंबरमध्ये ती महिला तिच्या माहेरी राहायला गेली आणि परत आलीच नाही.

Web Title: Denial of physical relations is mental cruelty, High Court approves divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.