इंडिगोविरोधात देशद्रोहाचा गुन्हा, भारतीय चलन स्वीकारण्यास दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 12:30 PM2017-11-23T12:30:30+5:302017-11-23T15:58:26+5:30
विमानसेवा देणारी कंपनी इंडिगो एअरलाइंस पुन्हा एकदा वादात आहे. कंपनीच्या एका कर्मचा-याने भारतीय चलन स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर कंपनीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - विमानसेवा देणारी कंपनी इंडिगो एअरलाइंस पुन्हा एकदा वादात आहे. कंपनीच्या एका कर्मचा-याने भारतीय चलन स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर कंपनीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीचे रहिवासी प्रमोद कुमार जैन यांनी याबाबत तक्रार केली आहे. त्यानंतर दिल्लीच्या सरोजनी नगर पोलीस स्थानकात इंडिगोविरोधात कलम 124 (A) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडिगोनेही या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.
प्रमोद कुमार हे 10 नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथून इंडिगोच्या 6E95 या विमानाने दुबई जात होते. त्यांच्या तिकीटासोबत जेवण समाविष्ट नसल्याने त्यांनी जेवणाची वेगळी ऑर्डर दिली. पण त्यासाठी त्यांनी भारतीय पैसे देऊ केले असता कर्मचा-याने पैसे स्वीकारण्यास नकार देत, आम्हाला केवळ परदेशी चलन स्वीकारण्यास सांगण्यात आल्याचं सांगितलं. जैन यांनी अनेकदा विनंती करूनही भारतीय चलन त्यांनी स्वीकारलं नाही, त्यानंतर प्रमोद कुमार जैन यांनी इंडिगोविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला.
दुसरीकडे, इंडिगोने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांदरम्यान आम्ही भारतीय चलन स्वीकारत नाही. फेमाच्या (फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट) नियमानुसार असं केलं जातं, आणि याबाबत आमच्या ऑन बोर्ड मेन्यूमध्येही उल्लेख करण्यात असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्याने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर इंडिगोने माफी मागत संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीने कर्मचा-यावर कारवाई केली होती.
We have filed a request for carrying on-board sales in INR (above 25,000) with Reserve Bank of India on February 26, 2014 and June 05, 2014. We are in active discussions with the concerned authorities in this regard: IndiGo
— ANI (@ANI) November 22, 2017