दिल्लीत दाट धुके, ५२ रेल्वेगाड्यांना विलंब
By Admin | Published: December 25, 2016 01:03 AM2016-12-25T01:03:41+5:302016-12-25T01:03:41+5:30
ख्रिसमसच्या आदल्या दिवशीच दिल्लीत आणि संपूर्ण उत्तर भारतामध्ये पुन्हा थंडीची जोरदार लाट आली असून, राजधानी दिल्लीतील किमान तापमान ८ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली
नवी दिल्ली : ख्रिसमसच्या आदल्या दिवशीच दिल्लीत आणि संपूर्ण उत्तर भारतामध्ये पुन्हा थंडीची जोरदार लाट आली असून, राजधानी दिल्लीतील किमान तापमान ८ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने शनिवारी लोकांना हुडहुडी भरली आहे, तर दुसरीकडे दाट धुक्यामुळे शनिवारी ५२ रेल्वे उशिराने धावत होत्या. विमाने तसेच रस्ते वाहतुकीवरही धुक्याचा परिणाम झाला आणि विमानांचे वेळापत्रकही कोलमडून पडले. रस्त्यांवरून वाहने चालविणेही चालकांना अवघड झाले होते.
पंजाब, हरियाणा आणि राजस्थान तसेच बिहार व उत्तर प्रदेशमध्येही कडाक्याची थंडी होती. हरियाणामध्येही जणू थंडीची लाट होती. मात्र बहुसंख्य सरकारी व खासगी कार्यालयांना सुटी असल्याने लोकांनी थंडीचा आनंद घेतला.
रेल्वे विभागाने सांगितले की, दाट धुक्यामुळे ५२ रेल्वे उशिराने धावत आहेत तर ७ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
दिल्लीच्या सफदरजंग आणि पालम या दोन विमानतळांच्या परिसरात पहाटे ५ वाजता दृश्यमानता जेमतेम २०० मीटर आणि ३०० मीटर एवढी होती. त्यामुळे पहाटे विमानांची उड्डाणे रखडली आणि येणाऱ्या विमानांनाही विलंब झाला. दिल्लीतील विमान उड्डाणे सकाळनंतर सामान्य झाली. तापमान लवकरच सामान्य होईल, असे सांगण्यात आले. सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ९७ टक्के एवढी नोंदली गेली. शुक्रवारी कमाल तापमान २५.२ डिग्री सेल्सिअस होते. तर, किमान तापमान ७.८ एवढे होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)