श्री रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरण : शेकडो वर्षांचा समतेचा लढा हीच ‘सबका साथ’ची प्रेरणा - पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 12:35 PM2022-02-06T12:35:49+5:302022-02-06T12:37:14+5:30
संत आणि महान क्रांतिकारी समाजसुधारक श्री रामानुजाचार्य यांच्या एक हजाराव्या जयंतीनिमित्त हैदराबादजवळील शमशाबाद येथील त्यांच्या २१६ फूट उंच बैठ्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
यदु जोशी -
हैदराबाद : स्वातंत्र्याचा लढा हा सत्तेसाठी नव्हे तर समतेसाठीही होता. त्याआधी श्री रामानुजाचार्य यांच्यासारख्या महान विभूतींनी सामाजिक समतेचे केलेले कृतिशील आचरण हीच स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा बनली आणि आज आपल्या सरकारने सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास... असा संकल्प सोडला आहे. त्यामागची प्रेरणादेखील तीच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले.
संत आणि महान क्रांतिकारी समाजसुधारक श्री रामानुजाचार्य यांच्या एक हजाराव्या जयंतीनिमित्त हैदराबादजवळील शमशाबाद येथील त्यांच्या २१६ फूट उंच बैठ्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी तेलंगणच्या राज्यपाल तमिलीसाई सौंदरराजन, केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी, रामानुजाचार्य संस्थानचे प्रमुख एचएच चिन्ना जियार स्वामी आदी उपस्थित होते. आजारी असल्याने तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला विमानतळावर व रामानुजाचार्य पुतळा अनावरण समारंभाला जाऊ शकले नाहीत. पंतप्रधान म्हणाले की, वाईट प्रथा रूढ होतात तेव्हा समाजसुधारणांसाठी कोणीतरी महापुरुष पुढे येतो, हा आपला इतिहास आहे. त्या काळात अशा सुधारकांना विरोध झाला, तरी नंतर त्यांचा स्वीकार होतो आणि सन्मानही मिळतो. चुकीच्या मार्गाने समाजाला नेणाऱ्यांना समाज मान्यता देत नाही, असा टोला त्यांनी हाणला. एचएच चिन्ना जियार स्वामी म्हणाले की, रामानुजाचार्य यांनी एक हजार वर्षे रुजवलेली शिकवण पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी १ हजार कोटी रुपये जनसहभागातून गोळा करून हा प्रकल्प उभारला आहे.