बांगड्या, सिंदूरला नकार देणे म्हणजे पत्नीचा लग्नाला नकार; पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 03:29 AM2020-06-30T03:29:09+5:302020-06-30T07:11:44+5:30
आसाममधील कौटुंबिक न्यायालयाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज फेटाळला होता व त्याचे कारण दिले होते की, पतीशी त्याच्या पत्नीने कोणतेही क्रूर वर्तन केल्याचे आढळलेले नाही
गुवाहाटी (आसाम) : हिंदू विवाहित महिला साखा (शंखापासून बनवलेल्या बांगड्या) हातात घालण्यास आणि सिंदूर भांगेत भरण्याच्या विवाह विधी आणि प्रथेला नकार देऊन पतीसोबत लग्न झाले यालाच नकार देत आहे, असे निरीक्षण नोंदवून गुवाहाटी उच्च न्यायालयाने तिच्या पतीला घटस्फोट मंजूर केला.
मुख्य न्यायमूर्ती अजय लांभा आणि न्यायमूर्ती सौमित्र सैकिया यांच्या खंडपीठाने म्हटले की, ‘‘हिंदू वधूची चिन्हे असलेल्या साखा (बांगड्या) आणि सिंदूर भांगेत ठेवण्यास तिच्या असलेल्या स्पष्ट नकाराचा अर्थ असा होतो की, ती पतीसोबत लग्न झालेले आहे हे मान्य करीत नाही.’’ या परिस्थितीत पतीला त्या महिलेसोबत विवाहित असण्याची सक्ती असणे छळच असू शकेल, असे न्यायालयाने १९ जून रोजीच्या आदेशात म्हटले.
तत्पूर्वी, आसाममधील कौटुंबिक न्यायालयाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज फेटाळला होता व त्याचे कारण दिले होते की, पतीशी त्याच्या पत्नीने कोणतेही क्रूर वर्तन केल्याचे आढळलेले नाही. २०१३ मध्ये पत्नीने पतीचे घर सोडले व पती व त्याच्या कुटुंबियांविरुद्ध ४९८ ए कलमान्वये तक्रार दाखल केली. उच्च न्यायालयाने पती व त्याच्या नातेवाईकांची या आरोपांतून निर्दोष सुटका केली.