भारताला दूषणे देणारेच अणुइंधन नाकारतात
By admin | Published: April 7, 2015 03:56 AM2015-04-07T03:56:15+5:302015-04-07T03:56:15+5:30
हवामान बदलाच्या मुद्यावर भारताची उपलब्धी व प्रयत्नांविरोधात गळा काढणाऱ्या विकसित देशांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी खरमरीत टीका केली
नवी दिल्ली : हवामान बदलाच्या मुद्यावर भारताची उपलब्धी व प्रयत्नांविरोधात गळा काढणाऱ्या विकसित देशांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी खरमरीत टीका केली. भारताला ‘सल्ला’ देणारे देशच स्वच्छ ऊर्जेसाठी अणुइंधन देण्यास नकार देतात, अशा शब्दांत मोदींनी विकसित देशांच्या मनोवृत्तीवर ताशेरे ओढले.
भारत अणुऊर्जेसह स्वच्छ ऊर्जेच्या वापरासाठी कटिबद्ध आहे, यावर जोर देत अणुइंधन आयात करण्याबाबत भारतावरील प्रतिबंध शिथिल करावे, असे मोदी म्हणाले. विविध राज्यांचे पर्यावरण मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या एका संमेलनात मोदी बोलत होते.
जग वाढत्या हवामान बदलामुळे चिंतित आहे व भारत या मार्गात अडचणी निर्माण करीत आहे, अशा चुकीच्या पद्धतीने भारताकडे पाहिले जात आहे. आमच्या देशात निसर्गाची परमेश्वर म्हणून पूजा केली जाते व म्हणून हवामान बदलाविरुद्धच्या लढाईत भारताला जागतिक नेतृत्व म्हणून समोर आले पाहिजे, असे मोदी यावेळी म्हणाले.
विरोधकांकडून दिशाभूल
वादग्रस्त भू संपादन विधेयकाच्या मुद्यावर वादळ उठले असतानाच, आदिवासी व वन जमिनीबाबत विरोधक लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप मोदी यांनी केला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)