विजय मल्ल्यांना पाठवण्यास नकार

By admin | Published: May 12, 2016 04:04 AM2016-05-12T04:04:04+5:302016-05-12T04:04:04+5:30

मनी लाँड्रिंगच्या आरोपाचा सामना करीत असलेले मद्यसम्राट विजय मल्या यांना हद्दपार करून भारतात पाठविण्यास ब्रिटनने स्पष्ट नकार दिला आहे.

Denying to send Vijay Mallya | विजय मल्ल्यांना पाठवण्यास नकार

विजय मल्ल्यांना पाठवण्यास नकार

Next

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंगच्या आरोपाचा सामना करीत असलेले मद्यसम्राट विजय मल्या यांना हद्दपार करून भारतात पाठविण्यास ब्रिटनने स्पष्ट नकार दिला आहे. तथापि मल्ल्यांचे प्रत्यार्पण करण्याच्या भारताच्या विनंतीवर आपण विचार करू शकतो, असे ब्रिटनने म्हटले आहे. मल्ल्यांना भारतात परत आणण्यासाठी त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर प्रत्यार्पण प्रक्रियेची सुरुवात करण्यात येणार असल्याचे वित्तमंत्री अरुण
जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले.
मल्ल्यांना हद्दपार करून भारतात पाठविण्यात यावे, अशी विनंती भारत सरकारने पंधरा दिवसांपूर्वी ब्रिटनला केली होती. मात्र ब्रिटनने भारतात बुधवारी उत्तर दिले. मल्ल्यांचा भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंटही जारी करण्यात आला आहे.
‘१९७१ च्या इमिग्रेशन अ‍ॅक्टअंतर्गत जर एखाद्या व्यक्तीजवळ ब्रिटनमध्ये प्रवेश करतेवेळी वैध पासपोर्ट असेल तर देशात वास्तव्य करतानादेखील त्या व्यक्तीजवळ वैध पासपोर्ट असलाच पाहिजे याची ब्रिटनला आवश्यकता वाटत नाही, असे ब्रिटन सरकारने आम्हाला सांगितले आहे. सोबतच ब्रिटनने मल्ल्यांविरुद्धच्या आरोपांचे गांभीर्य मान्य केले आहे आणि भारत सरकारची मदत करण्याची इच्छा जाहीर केली आहे. परस्पर कायदेशीर सहकार्य किंवा प्रत्यार्पणाच्या भारताच्या विनंतीवर आपण विचार करू शकतो, असे ब्रिटनने सांगितले आहे,’ अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली. १९९३ मध्ये भारत आणि ब्रिटन यांच्यादरम्यान प्रत्यार्पण करार झाला होता. या कराराअंतर्गत आता मल्ल्यांचे प्रत्यार्पण केले जाऊ शकते.
मल्ल्यांना भारतात आणण्यासाठी आता आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर प्रत्यार्पणाची प्रक्रिया प्रारंभ करण्यात येईल, असे अरुण जेटली यांनी राज्यसभेत सांगितले. ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीने वैध पासपोर्टच्या आधारावर ब्रिटनमध्ये प्रवेश केला असेल आणि नंतर त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला असेल तरीदेखील त्या व्यक्तीला हद्दपार केले जाऊ शकत नाही, असे ब्रिटनने भारताला कळविले आहे.

Web Title: Denying to send Vijay Mallya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.