Deoghar Ropeway Accident: रोपवे रेस्क्यू ऑपरेशनवेळी मोठा अपघात; २ हजार फुटांवरून लष्करी हेलिकॉप्टरमधून युवक पडला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 07:21 PM2022-04-11T19:21:04+5:302022-04-11T19:21:31+5:30
देवघर जिल्ह्यातील त्रिकुट डोंगरावर रोपवेच्या दुर्घटनेनंतर ट्रॉलीमध्ये लटकलेल्या ४८ पैकी २६ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
नवी दिल्ली – झारखंडच्या देवघर रोपवे येथे रविवारी झालेल्या दुर्घटनेत अनेक लोकं रोपवे अडकली होती. १८ तासांपासून या लोकांना रेस्क्यू करण्याचं काम केले जात आहे. लष्कराच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले आहे. मात्र याच रेस्क्यू ऑपरेशनवेळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. रेस्क्यूवेळी एका युवक लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून खाली पडल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे.
बचावकार्य सुरू
देवघर जिल्ह्यातील त्रिकुट डोंगरावर रोपवेच्या दुर्घटनेनंतर ट्रॉलीमध्ये लटकलेल्या ४८ पैकी २६ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. वायुसेना, आयटीबीपी, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाचे पथक संयुक्तपणे बचाव कार्यात गुंतले आहेत. हेलिकॉप्टरला लटकलेले लष्कराचे जवान दोरीच्या साहाय्याने एकामागून एक लोकांना ट्रॉलीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. एनडीआरएफचे निरीक्षक ओमप्रकाश यांनी सांगितले की, २२ लोक अजूनही ६ रोपवेमध्ये अडकले आहेत, ज्यांना रात्रीपर्यंत बाहेर काढले जाईल.
रघुवर दास यांचा सोरेन सरकारवर निशाणा
देवघर रोपवे दुर्घटनेवरून झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन सरकारवर निशाणा साधला आहे. ही घटना सरकारचे अपयश असल्याचे दास म्हणाले. रविवारी जेव्हा अपघात झाला तेव्हाच सरकारनं दखल घ्यायला हवी होती.मात्र ही राजकारण करण्याची वेळ नाही असं सांगत झारखंडचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री बन्ना गुप्ता यांनी त्यांना उत्तर दिले आहे.
तसेच देवघर प्रकरणात सरकारने मृतांच्या नातेवाईकांना एक कोटींची भरपाई द्यावी. सरकारच्या अपयशामुळे २ मृत्यू झाले आहेत. तर ४८ पर्यटक रात्रभर भुकेने तहानलेल्या हवेत लटकत होते, ज्या जिल्ह्यातून पर्यटन मंत्री येतात ते घटनेला १८ तास उलटूनही घटनास्थळी पोहोचले नाहीत. हे दुर्दैवी आहे. एनडीआरएफ आणि सीआरपीएफ जवानांवर विश्वास आहे असं झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास म्हणाले.
कसा झाला अपघात?
पर्यटकांच्या माहितीनुसार, रोपवे सुरू असताना वरून खाली येणाऱ्या ट्रॉलीची धडक खालून वर जाणाऱ्या ट्रॉलीला दिली. त्यानंतर इतर ट्रॉली जागेवरून निसटल्या तेव्हा ही दुर्घटना आहे. रोपवे तारांच्या विविध भागात जवळपास १२ ट्रॉली अडकल्या आहेत. काही ट्रॉलीतून अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात आली. मात्र खूप उंचावर असल्याने अद्याप याठिकाणी बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी एनडीआरएफची टीम बोलवण्यात आली. मात्र उंची जास्त असल्याने त्यांनाही रेस्क्यू करताना अडथळा निर्माण झाला. त्यानंतर सोमवारी सकाळी लष्कराने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले.