अरे देवा! नवऱ्याच्या त्रासाला कंटाळलेल्या बायका इन्स्टावर पडल्या प्रेमात; मंदिरात केलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 09:43 IST2025-01-24T09:42:59+5:302025-01-24T09:43:47+5:30
दोन विवाहित महिलांनी मंदिरात जाऊन एकमेकींशी लग्न केल्याची अजब घटना समोर आली आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये दोन विवाहित महिलांनी मंदिरात जाऊन एकमेकींशी लग्न केल्याची अजब घटना समोर आली आहे. महिलांचं म्हणणं आहे की, त्यांचे पती त्यांना छळत होते. याच दरम्यान, त्या इन्स्टाग्रामवर एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या. त्या सहा वर्षे एकमेकांच्या संपर्कात राहिल्या आणि त्याच काळात दोघीही एकमेकींच्या प्रेमात पडल्या.
दोघींनीही मंदिरात एकमेकींना हार घालून लग्न केलं. त्यांच्या या लग्नाची आता सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. आता आम्ही आयुष्यभर एकत्र राहू आणि कोणीही आम्हाला वेगळं करू शकत नाही असं त्या म्हणत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूर जिल्ह्यातील बांसगाव भागात ही घटना घडली आहे. दोन्ही महिला याच परिसरातील रहिवासी आहेत.
महिलांनी आरोप केला आहे की, त्यांचे पती त्यांना छळत असत. एका महिलेचं म्हणणं आहे की, तिचा नवरा दारूच्या नशेत तिला दररोज मारहाण करायचा. तिला चार मुलंही आहेत. रोजच्या मारहाणीला कंटाळून ती तिच्या आईवडिलांच्या घरी राहू लागली. दुसऱ्या महिलेने सांगितलं की, तिचा नवराही दारू प्यायचा आणि विनाकारण तिच्यावर संशय घ्यायचा, त्यामुळे तिने तिच्या पतीला सोडून दिलं.
दोन्ही महिला याच दरम्यान इन्स्टाग्रामवर कनेक्ट झाल्या आणि त्यांची मैत्री झाली. दोघींनीही एकमेकींना आपलं दुःख सांगितलं. हळूहळू दोन्ही महिलांमधील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघीही एकमेकींना गुपचूप भेटत राहिल्या. हे जवळपास सहा वर्ष चालू राहिलं. यानंतर दोघींनीही एकत्र जगण्याची शपथ घेतली. आता त्यांनी नवीन आयुष्य सुरू केलं आहे.