सीमेवर तैनातीआधी सैनिकाला विशेष प्रशिक्षण!
By admin | Published: April 9, 2016 03:34 AM2016-04-09T03:34:24+5:302016-04-09T03:34:24+5:30
रतीय भूदलाची तैनाती सध्या दोन विभागांत होते. शांतता क्षेत्र आणि युद्धक्षेत्र. देशाच्या अंतर्गत भागांतील लष्करी छावण्यांना शांतता क्षेत्र
संकेत सातोपे, जम्मू
भारतीय भूदलाची तैनाती सध्या दोन विभागांत होते. शांतता क्षेत्र आणि युद्धक्षेत्र. देशाच्या अंतर्गत भागांतील लष्करी छावण्यांना शांतता क्षेत्र, तर जम्मू- काश्मीर, सियाचीनसारख्या अस्वस्थ सीमांना युद्धक्षेत्र म्हणण्यात येते. जवानापासून ते उच्च पदाधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाला तीन वर्षे युद्धक्षेत्रात आणि तीन वर्षे शांतता क्षेत्रात तैनात करण्यात येते. मात्र युद्धक्षेत्रात तैनातीपूर्वी प्रत्येक सैनिकाला विशेष प्रशिक्षण देण्यात येते. एलओसीलगतच चालणारे हे अत्यंत कठोर प्रशिक्षण जम्मू दौऱ्यातील पत्रकारांना पाहता आले.
शांतता क्षेत्रातून आलेल्या सैनिकाला सीमेवर उभे राहण्यासाठी शारीरिक आणि मानिसकदृष्ट्या तयार करण्याचे काम ‘बॅटल स्कूल’मध्ये करण्यात येते. त्या- त्या भागातील सीमेवरील समस्या आणि आव्हानांची माहिती करून देत जवानांना तेथील भूगोल आणि वातावरणासाठी तयार केले जाते. लष्कराच्या साउदन कमांडमध्ये अशी चार बॅटल स्कूल आहेत.
दोन्ही खांद्यांचा वापर करून बंदूक चालविणे, अचूक लक्ष्यभेद करणे, अडथळ््यांची शर्यत आदी अनेक गोष्टी त्यांच्याकडून करून घेतल्या जातात. येथे प्रत्येक जवानाची वैद्यकीय चाचणी केली जाते. तसेच मानसशास्त्रतज्ज्ञांकडून त्यांचे समुपदेशन करण्यात येते, यात उत्तीर्ण होणाऱ्यांनाच पुढे सीमेवर तैनात केले जाते. या युद्ध प्रशिक्षणामुळे
सीमेवर होणारे मृत्यू आणि आत्महत्यांचे प्रमाण खूपच कमी करण्यात यश आल्याचे प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुखांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आंतरराष्ट्रीय सीमेऐवजी नियंत्रण रेषा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा भारताच्या सीमा ठरवित असल्यामुळे लष्कराच्या कामात मूलभूत बदल झाला आहे. सीमा सुरक्षेचे, गस्त घालण्याचे, पहारा देण्याचे मूलत: बीएसएफचे असलेले कामही लष्करालाच करावे लागत आहे. म्हणूनच सीमेवर तैनातीपूर्वीच्या जवानांच्या प्रशिक्षणात काही बदल करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, एका रात्री लष्कराला ‘सेंसिंग दे डेंजर’चे प्रशिक्षण दिले जाते. यात जवानाला जंगलात नेऊन आवाज, प्रकाश किंवा अन्य गोष्टींच्या माध्यमातून घुसखोरांच्या हालचालींचा सुगावा घ्यायला शिकविले जाते. तसेच इन्फ्रारेड कॅमेरा, नाइट व्हिजन गॉगल, आदीचा उपयोग करून टेहळणी करणे, गस्त घालणे, गस्त घालताना आढळणाऱ्या संशयास्पद गोष्टींचे हाताळणे, संशयास्पद
व्यक्ती दिसल्यानंतर त्याची
तपासणी करण्याची पद्धती, गोळीबाराच्या आवाजावरून बंदुकीचा आणि अंतराचा अंदाज लावणे
अशा अनेक गोष्टी येथे शिकविण्यात येतात.
तसेच शत्रूकडून वापरण्यात येणारी शस्त्रास्त्रे, भूसुरूंग, आईडी आदीचे प्रकार ते ओळखण्याची आणि निकामी करण्याची पद्धत प्रात्यक्षिकांद्वारे शिकविण्यात येते. ‘मोअर स्वेट इन पीस, लेस ब्लड इन वॉर’ हे या प्रशिक्षण केंद्राचे ब्रीद आहे. त्यानुसार येथे जवानांकडून दिवस-रात्र घाम गाळून घेण्यात येतो. त्याचेच सकारात्मक परिणाम सीमेवरील लष्करी कारवायांमध्ये दिसून येत आहेत.