20 कोटींहून अधिक जनधन खात्यांत थेट पैसे जमा केले- निर्मला सीतारामण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 12:51 PM2020-05-17T12:51:37+5:302020-05-17T12:53:06+5:30
तंत्रज्ञानामुळे तात्काळ पैसे गरवंतांना दिले गेले असल्याचं त्यांनी अधोरेखित केले. आतापर्यंत 6.81 कोटी उज्ज्वला सिलिंडरसाठी वाटल्याचंही त्यांनी सांगितलं.
नवी दिल्लीः देशातील 20 कोटी जनधन खात्यांमध्ये पैसे दिले आहेत. जनधन योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर 20,267 कोटी रुपये वळते केले आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली आहे. तसेच गरिबांना आर्थिक मदत दिली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 16 हजार 394 कोटी थेट गरजूंच्या खात्यात जमा केले आहेत, अशी माहिती देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली. तंत्रज्ञानामुळे तात्काळ पैसे गरवंतांना दिले गेले असल्याचं त्यांनी अधोरेखित केले. आतापर्यंत 6.81 कोटी उज्ज्वला सिलिंडरसाठी वाटल्याचंही त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेजच्या संदर्भात आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सलग पाचव्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. या आधीच्या चार पत्रकार परिषदांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, स्थलांतरित मजूर, वीज कंपन्या, स्थावर मालमत्ता, वित्त संस्था, कृषी, कोळसा, खनिज आणि संरक्षण क्षेत्रासंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या.
देशातील गरिबांच्या खात्यात 16 हजार 394 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले असल्याचंही त्या म्हणाल्या. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि गरिबांवर उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ नये म्हणून सरकारनं मागील दोन महिन्यांच्या काळात अनेक उपाययोजना केल्या. गरिबांना, स्थलांतरित मजुरांना मदत देण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान गरीब योजनेतंर्गत ही मदत करण्यात आली. आतापर्यंत जनधन खात्यात 10 लाख 225 कोटी रुपये जमा करण्यात आले. विविध योजनातंर्गत 16 हजार 394 कोटींची मदत जमा करण्यात आली आहे. त्याचबरोबर 25 कोटी गरीब, मजुरांना गहू, तांदूळ मोफत वाटप करण्यात आलं, अशी माहिती त्यांनी दिली. तर 2.2 कोटी बांधकाम कामगारांना 3950 कोटी रुपये मिळाले असल्याचे त्यांनी सांगितलं.