मंदी आली दाराशी !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 04:53 AM2019-09-15T04:53:29+5:302019-09-15T04:53:35+5:30

मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे व जीएसटी धोरणाच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळेच, देशात आर्थिक मंदीचे वारे वाहू लागले आहे,

Depression came on the doorstep! | मंदी आली दाराशी !

मंदी आली दाराशी !

Next

मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे व जीएसटी धोरणाच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळेच, देशात आर्थिक मंदीचे वारे वाहू लागले आहे, असे वाचकांनी ठामपणे म्हटले आहे. पाच ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याच्या घोषणा सुरू असताना अनेक उद्योग अडचणीत आल्याने हजारो लोकांच्या रोजगारांवर कुºहाड कोसळली आहे. दुसरीकडे महागाई वाढतच आहे. या सर्वांची झळ आमच्या घरांपर्यंत बसू लागली आहे, असे बहुतांश वाचकांनी कळविले आहे.
>मंदीची झळ सामान्यांच्या दारात
प्रस्थापितांच्या बेजबाबदार व अदूरदर्शी धोरणांमुळे भारत हा आर्थिक मंदीच्या खाईत जात आहे. वाहननिर्मिती, बांधकाम व्यवसाय, शासकीय खात्यातील नोकरकपात, काही खाती बंद होण्याच्या मार्गावर येणे, घसरत असलेला जीडीपी, बंद पडत चाललेले मोठमोठे उद्योग यांपासून वाढती बेरोजगारी आणि छोटे छोटे व्यवसायिक यांपर्यंत मंदीची लाट येऊ लागली आहे. करवाढ करून सरकार आर्थिक परिस्थिती सावरण्याचा फोल प्रयत्न करताना दिसत आहे. सर्वसामान्यांच्या हातातील काम व खिशातील दाम नाहीसा होत असताना धनदांडग्यांच्या जरी नसली तरी सर्वसामान्य जनतेच्या दारात मंदीची झळ येऊन पोहोचलेलेली आहे. वेळीच जाणकार सूज्ञ अभ्यासु व अनुभवी अर्थशास्त्रज्ञांकडून योग्य ते ठोस उपाय योजावे लागतील
- प्रज्ञावंत सुनील कांबळे,
गव्हर्नमेंट कॉलनी, सांगली.
>इच्छा असूनही काम मिळेना
देशात मंदी आहे असे म्हटले जाते, पण ती खरंच आहे की त्याचा बाऊ केला जात आहे, हेच कळेनासे झाले आहे. मी एका शैक्षणिक संस्थेत दोन वर्षे प्रयोगशाळा सहायक म्हणून काम करत होतो. तुटपुंज्या पगारावर काम करत असताना मागच्या जूनमध्ये तीही नोकरी गेली. बाहेर अनेक ठिकाणी कामाचा शोध घेतला, पण मंदी आहे नंतर बघू अशीच उत्तरे ऐकायला मिळतात.
- अजित जोंधळे, लक्ष्मी कॉलनी, छावणी, औरंगाबाद.
>नवीन कौशल्ये शिकायची हीच वेळ
आजघडीला आपला भारत देश एका संक्रमणावस्थेतून जातो आहे. सध्या विविध आघाड्यांवरच्या प्रगतीचा किंवा विकासाचा वेग नक्कीच मंदावल्यासारखा दिसतो आहे खरा, पण सगळेच चित्र निराशाजनक नक्कीच नाही. विकासाचा, वाढीचा, उत्पादनाचा वेग मंदावला आहे, परंतु थांबलेला नाही. ही अवस्था लवकरच जाईल. जगात अशा रीतीने चिरंतन किंवा शाश्वत काहीही नसते आणि म्हणूनच ह्या मंदीचा जास्त बाऊ करू नये. हे एक चक्र आहे व जागतिक स्तरावर तिने हातपाय पसरले आहेत. ह्या काळात खर्च कमी करणे व उत्पन्नाचे नवीन स्त्रोत शोधणे ही व्यूहरचना घरात तसेच व्यवसायाला लागू पडते. सर्व वयाच्या व्यक्तींनी नवीन कौशल्ये शिकायची हीच वेळ आहे. नंतर जेंव्हा अर्थव्यवस्था उभारी घेईल तेंव्हा हीच कौशल्ये अर्थवृद्धीसाठी कामी येतील.
- डॉ. दीपक शिकारपूर,
उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक, पुणे.
>रोजगाराच्या अनेक संधी आहेत
एखादी कंपनी शासकीय असो वा खाजगी बंद पडली की त्यातले कामगार बेकार झाले म्हणून टाहो फोडण्यापेक्षा सरकार वा खाजगी क्षेत्रात अनेक पर्याय असे आहेत की या लोकांना सामावून घेतले जाऊ शकते. शासनाने युवकांना मोबाईलच्या नेट मध्ये व्यस्त न ठेवता त्यांना स्वयंरोजगाराची माहिती देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून घ्यावे शिक्षक वर्गाला अशैक्षणिक कामे देण्यापेक्षा तरुण व बेरोजगार वर्गाला ही कामे द्यावीत त्यामुळे शासनाची कामे पण चांगल्या पद्धतीने पूर्ण होतील व बेरोजगार पण कामात व्यस्त राहतील. त्यामुळे बेरोजगारी ,भ्रष्टचार ,लूटमार कमी होण्यास मदत होईल .
- अंकिता राजेंद्र कळमकर,
राष्ट्रीय अध्यापक विद्यालय,
हनुमान नगर, नागपूर.
>व्यवसायात तेजी-मंदी असतेच...
सध्या सुरू असलेल्या व सोशल मीडियावर अति प्रमाणात व्हायरल होत असलेली मंदी मला एक व्यावसायिक व एक कुटुंब चालक म्हणून अजिबात जाणवत नाही. व्यवसाय म्हटले की चढ-उतार हा त्याचा अविभाज्य भाग. गेल्या पंचवीस वर्षात असे अनेक चढ-उतार मी प्रत्यक्ष अनुभवले आहेत. आणि अर्थातच माझ्या व्यवसायात मला याच्यापेक्षा वेगळे काही जाणवले नाही. किंबहुना सध्या सुरू असलेल्या रस्ते, पाणी व वीज यातील विकास हा माझ्या कराच्या पैशातून होतो आह,े याचे खूप समाधान आहे. याउलट प्रत्येक व्यक्तीला बचतीची सवय लावण्याचा व त्याचे महत्त्व समजण्याचा हा निश्चित काळ आह,े असे मला वाटते.
- योगेश शामराव कुलकर्णी,
पार्थ, शाखांबरी नगर, कराड रोड, पंढरपूर, जि. सोलापूर.
>उत्पन्न घटले, खर्च वाढला
देशाच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे मळभ दाटून येत असतांना, त्याचे पडसाद सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर पडणे साहजिक आहे. हजारो उद्योग बंद पडत आहेत. दोन रुपयांचा बिस्किटाचा पुडा खरेदी करणे जिकरीचे होऊन बसल्याने, पार्लेसारखा अहंभावी उद्योगालाही कामगारांची मोठ्या संख्येने कपात करावी लागत असेल, तर त्या देशातील जनता खरेच कार घेण्याचे स्वप्न रंगवू शकते काय? महागाईमुळे सामान्य माणसाचे बजेट पार कोसळून गेले आहे. माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अर्थतज्ज्ञाच्या विचारांना जी व्यवस्था केराची टोपली दाखविते, तेथे आर्थिक उत्कर्षाची अपेक्षा फलिभूत कशी व्हावी? नोटाबंदी आणि जीएसटी नंतर, अर्थव्यवस्था पार खिळखिळी झाली, पण लक्षात कोण घेणार! व्यवसाय माहितीच्या क्षेत्रातील 'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी' या कंपनीने २०१७ मध्ये बेरोजगारीचा ३.४ टक्यावर असलेला दर आता ९ टक्क्यांवर येत असल्याचे म्हंटले आहे. उंदरांच्या सूक्ष्म हालचालींवर कडक पहारा ठेऊन, झडप घालणाऱ्या मांजरीसारखे जर सरकार नजर ठेवून वागत असेल तर, खरेदी विक्रीचा संकोच होणार आहे.
- डॉ. नूतनकुमार सी.पाटणी,
चिकलठाणा, औरंगाबाद.
>गरिबांना कसली चिंता?
आज जी आर्थिक मंदी जाणवत आहे, त्याचा सामान्य किंवा दारिद्र्यरेषेखालील जनतेला फारसा फरक पडत नाही. आज वाहन उद्योगासारखे मोठे उद्योग अडचणीत आले आहेत. त्याची मूळ कारणे शोधली तर मागणीपेक्षा उत्पादन जास्त होत आहे. ज्याप्रमाणे शेतमालाचे उत्पादन मागणीपेक्षा जास्त झाले तर शेतमाल मातीमोल भावाने विकावा लागतो तीच गत आज उद्योगाची झाली आहे . त्यामुळे कंपन्यांच्या नफ्यात घसरण झाली. उत्पादन खर्चावर आधारित किंमतीत उद्योजकानीं आपला माल विकला तर आर्थिक मंदीचा फटका बसणार नाही.
-विश्वासराव पाटील,
धानोरा (वि), ता. नांदुरा, जि.बुलडाणा.
>पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था कशासाठी?
सध्याची अर्थिक मंदी म्हणजे सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचाच परिपाक आहे. आर्थिक क्षेत्रात हाहाकार माजला असताना सरकार पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविणार, अशा वल्गना करत आहे. कर वाढवून सरकार देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणार असेलही, परंतु दुसºया बाजूला हजारो कामगार बेकार होत आहेत त्याचे काय? बहुराष्टÑीय कंपन्याही धडाधड कामगार कपात करु लागल्याने अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने वेळीच पावले उचलायला हवीत.
-पद्माकर उखळीकर,
अध्यक्ष पी. एम. फौंडेशन, परभणी.
>नोटाबंदीमुळेच आर्थिक मंदी
सध्याच्या मंदीला नोटाबंदीचा निर्णयच जबाबदार आहे. जीएसटीमुळे व त्याच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे तीव्रता आणखी वाढली आहे. गेली ३० वर्षे बँकिंग क्षेत्रात काम करणाºया माझ्यासारख्या कर्मचाºयाला नोकरीच्या ठिकाणीही व घरीही मंदीचा प्रभाव जाणवतो. नोटबंदीनंतर अडचणीत आलेला शेतकरी अजूनी न सावरल्यामुळे महागाई वाढली आहे.
- मिलिंद यशवंत नेरलेकर,
टिळकनगर, डोंबिवली (पू.)
<उत्पन्न ४० टक्क्यांपर्यंत घसरले
माझ्या १५ वर्षांच्या व्यवसायिक जीवनामध्ये कधी नव्हती एवढी आर्थिक मंदी मी आज अनुभवत आहे. सध्याचा काळ हा नोटबंदीच्या निर्णयानंतरच्या काळाहूनही कठीण आहे. सर्वसामान्यांचे सरासरी उत्पन्न वार्षिक सरासरीच्या चाळीस टक्क्यांपर्यंत घसरलेले आहे. ‘कर संकलन हेच ध्येय’ असलेल्या शासनाच्या नीतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागलेली आहे. बचत करणे हे दुरापास्त झालेले आहे. बाजारपेठा ओस पडत चालल्या आहेत. शेतकरी, कष्टकरी, यामध्ये होरपळत आहेत.
- योगेश तेजराज चोपडा, दुधड, जि. औरंगाबाद.
>मंदी नाहीच, उद्योजकांचा केवळ कांगावा
आर्थिक मंदीची झळ कोणाच्याही घरापर्यंत पोहोचलेली नाही, परंतु उद्योजकाच्या अयोग्य धोरणामुळे मंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्योजकांनी गरजेचा अभ्यास न करता वाहन निर्मिती केली आहे व त्यांना कर जाळ्यातून सुटका हवी आहे. यासाठी विक्रीत घट व कामगार कपात असे म्हणून अस्वस्थ वातावरण निर्माण करीत आहेत. सरकार बद्दल अयोग्य भाव निर्माण करून लाभ प्राप्त करण्याचा एक अयोग्य प्रयत्न केला जात आहे. वाहन उद्योगातील मंदी बाबत माध्यमे फारच संवेदन शील आहेत .यापूवीर्ही मागणी असूनही तंत्रज्ञान सुधारित केले नाही म्हणून स्वयंचलित दुचाकी व चार चाकी वाहन निर्मितीचे कारखाने बंद पडले आहेत. व्हेस्पा, बजाज चेतक स्कूटर राजदूत, हिरो होंडा, एम-८०, अम्बेसिडर इत्यादी वाहने बाजारातून निघून गेली आहेत. तसेच सर्व सामान्यांच्या सोयीसाठी वाहने तयार होत नव्हती. तसेच त्यात योग्य संशोधनही होत नव्हते. त्यामुळे अनेक वर्षे बजाज चेतक स्कूटरची मक्तेदारी होती. स्कूटी पेप गाडी ने सामान्य व्यक्तीची सोय केली. तसेच चार चाकी मध्ये टाटांनी उशिराने छोटी गाडी निर्माण केली, परंतु तिचे उत्पादनही आता बंद केले आहे किंवा कमी केले आहे. वाहन उद्योगातील मंदी ही काळाची गरज आहे. वाहन संख्या प्रचंड झाली आहे. रस्त्यावर चालता येत नाही व वाहनही नेता येत नाही अशी परिस्थिती मोठ्या शहरात निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारकडे सवलती मागू नयेत. सेस कमी करा व आयकर कमी करा अशा मागण्या करण्यापेक्षा स्वत: पुढाकार घ्यावा. तसेच कामगार कपात करून समाजात अस्वस्थता निर्माण करून सरकारला अडचणीत आणू नये. वाहन उद्योजकांनी आपला नफा कमी करून किंमतीत कपात करावी व वाहन उत्पादनाला मर्यादा घालावी. शिवाय जुने द्या व नवे घ्या या तत्वावर ६० %दराने ना नफा ना तोटा या तत्वावर विक्री करावी. अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन कमी करावे पण कामगार कपात करु नये. कामाचा कालावधी सहा तास करावा पण चार पाळ्यात काम करावे. यातून मंदीवर मात करणे शक्य आहे.

-दिलीप वसंत सहस्त्रबुध्दे,
२0६, मुरारजी पेठ सोलापूर.

Web Title: Depression came on the doorstep!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.