लैंगिक संबंधांपासून वंचित ठेवणे क्रूरतेचा कळस; बलात्काराचे खोटे आरोप घटस्फोटासाठी भक्कम कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 07:30 AM2023-09-04T07:30:56+5:302023-09-04T07:31:06+5:30
पतीने दावा केला की, पत्नी लग्नाच्या पहिल्या दिवसापासून घरातील कर्तव्ये पार पाडण्यात अयशस्वी ठरली.
नवी दिल्ली : जोडप्याने एकमेकांना वैवाहिक संबंधांपासून वंचित ठेवणे, पती आणि त्याच्या कुटुंबीयांवर हुंड्यासाठी छळ किंवा बलात्काराचे खोटे आरोप करणे हा क्रूरतेचा कळस आहे. घटस्फोटासाठी हे एक भक्कम कारण असल्याचे एका खटल्याची सुनावणी करताना दिल्ली कोर्टाने म्हटले. न्यायाधीश सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने पतीला घटस्फोट देण्याची परवानगी देणारा कौटुंबिक कोर्टाचा आदेश कायम ठेवला.
कोर्टाने म्हटले...
nसहवास आणि वैवाहिक संबंध हे कोणत्याही वैवाहिक नात्याचे आधारस्तंभ आहेत हे पुन्हा सांगण्याची गरज नाही.
nजोडप्याने एकमेकांना संबंधांपासून वंचित ठेवण्यामुळे हा विवाह पुढे टिकू शकत नाही, हे सिद्ध होते.
nवैवाहिक नातेसंबंधापासून वंचित ठेवणे हे अत्यंत क्रूरतेचे कृत्य आहे.
पती म्हणतो...
पतीने दावा केला होता की पत्नी विवाहानंतर सतत नाखूश असे. कितीही प्रयत्न केले, तरी ती त्याला जवळही येऊ देत नसे. त्याने पत्नीला आपल्यासोबत डॉक्टरांकडे येण्यास सांगितले असता, तिने त्यास नकार दिला. जोडप्याने एकमेकांना वैवाहिक संबंधांपासून वंचित ठेवणे हा क्रूरतेचा कळस आहे. यावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे.
पतीने दावा केला की, पत्नी लग्नाच्या पहिल्या दिवसापासून घरातील कर्तव्ये पार पाडण्यात अयशस्वी ठरली. ती अनेकदा त्याला आणि कुटुंबाला न सांगता तिच्या आई वडिलांच्या घरी गेली. तसेच तिने आत्महत्या करण्याचा आणि त्याला व त्याच्या कुटुंबीयांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली होती.
२०१२ मध्ये लग्न केल्यानंतर हे जोडपे २०१४ पासून वेगळे राहत होते. यावरून हे सिद्ध होते की ते वैवाहिक संबंध राखण्यास असमर्थ होते. जवळपास नऊ वर्षांचा हा प्रकार अत्यंत मानसिक क्रौर्याचे उदाहरण आहे, असे कोर्टाने म्हटले.