देवेंद्र फडणवीसांना बेळगावात दाखविण्यात आले काळे झेंडे, महाराष्ट्र एकीकरण समितीची जोरदार घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 02:27 PM2023-05-04T14:27:24+5:302023-05-04T14:29:41+5:30
मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रातील नेतेमंडळीही प्रचारात सहभागी
बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचाराला जोर आला आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्याच्या सभेतून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपने आपली सत्ता कायम राखण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीसह स्टारप्रचारकांच्या प्रचारसभेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसनेही सत्ता मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
यात बेळगावकडे विशेष लक्ष लागून राहिले आहे. मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रातील नेतेमंडळीही प्रचारात सहभागी झाले आहेत. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बेळगावात प्रचारसभेसाठी गेले असता महाराष्ट्र एकीकरण समितीने फडणवीसांना काळे झेंडे दाखविले. यामुळे एकच गोंधळ उडाला.
भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेसाठी देवेंद्र फडणवीस आज, बेळगावात आले होते. यावेळी टिळक चौकात महाराष्ट्र एकीकरण समितीने त्यांना काळे झेंडे दाखवले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात फडणवीस प्रचाराला आल्याने समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यावेळी एकच गोंधळ उडाला.
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेळगावात दाखल झाले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीने देवेंद्र फडणवीसांना काळे झेंडे दाखविले. आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. pic.twitter.com/gzRHl93a0W
— Lokmat (@lokmat) May 4, 2023