ठाकरेंच्या टीकेनंतर शिंदेंच्या नेत्याने पुन्हा घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, "ही सदिच्छा भेटच"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 20:08 IST2025-02-12T20:08:24+5:302025-02-12T20:08:40+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली.

ठाकरेंच्या टीकेनंतर शिंदेंच्या नेत्याने पुन्हा घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, "ही सदिच्छा भेटच"
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत गौरव केला. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडीमध्ये मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा असा सन्मान करणं दुर्देवी असल्याचे संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या या विधानावरुन महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही टीका केली जात आहे. दुसरीकडे आता ठाकरे गटाच्या टीकेनंतर एकनाथ शिंदेंच्या नेत्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली आहे.
दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा पुरस्कार देऊन सन्मान केल्याने संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्के हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. या भेटीनंतर उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही सदिच्छा भेट होती असं म्हटलं.
“ही सदिच्छा भेटच होती. मी नरेश म्हस्के, संजय नाहरजी आम्ही शरद पवार यांना भेटलो. मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री मी आहे. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहे. मी मंत्री असल्याने आढावा घेण्यासाठी आलो होतो. स्वागताध्यक्ष म्हणून त्यांना भेटणं क्रमप्राप्त होतं. त्यांच्याशी साहित्य संमेलनाबाबतची चर्चा झाली,” असं उदय सामंत यांनी म्हटलं.
टीका करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावं - एकनाथ शिंदे
“टीका करणाऱ्यांनी महापराक्रमी महादजी शिंदेंचा अपमान केला. साहित्य संमेलनातील साहित्यिकांना दलाल म्हणत त्यांचा अपमान केला. शरद पवार साहेब जे त्यांना आत्तापर्यंत वंदनीय होते, पण त्यांनी माझा सत्कार केल्यामुळे यांनी त्यांचाही अपमान केला. परंतु आम्ही आरोपाला आरोपांनी उत्तर देणार नाही. जनता सुज्ञ असून चांगल्याला चांगलं म्हणण्याची महाराष्ट्राला परंपरा आहे, संस्कृती आहे. पण यांच्याकडून काय अपेक्षा करणार? त्यामुळे जनता यांना धडा शिकवेल, जनतेनं विधानसभेत यांना धडा शिकवला आहे, पण त्यातून यांनी काही बोध घेतलेला नाही. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करावं, आत्मपरीक्षण करावं,” असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना दिला.