COVID-19: कोरोनाबाबत सरकारचा मोठा निर्णय; आता विदेशातून परतल्यावर होणार कोविड चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 03:45 PM2022-12-21T15:45:27+5:302022-12-21T15:46:06+5:30
COVID-19 Cases In UP: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची रूग्णसंख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे, या पार्श्वभूमीवर भारतात दक्षता घेतली जात आहे.
लखनौ : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने रौद्ररूप दाखवण्यास सुरूवात केली आहे. यामुळे उत्तर प्रदेश सरकारने आता ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर यूपीचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी राज्यभर सतर्कतेचा इशारा दिला आहे. आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने तपासापासून उपचारापर्यंतची व्यवस्था सुरू करावी, असे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच विमानतळावरील सोयी सुविधा वाढवाव्यात. संक्रमणग्रस्त देशांमध्ये प्रवास करून परतलेल्या लोकांची चौकशी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले पाहिजे, जेणेकरून व्हायरसचे प्रकार शोधता येतील अशा सूचना त्यांनी दिल्या.
बुधवारी उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी राज्यातील सर्व सीएमओ आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. त्यांनी म्हटले की, कोरोना संसर्गग्रस्त देशातून येणाऱ्या प्रवाशांची चौकशी करण्यात यावी. जीनोम सिक्वेन्सिंग केले पाहिजे, जेणेकरून नवीन प्रकार लगेच शोधता येईल. सर्दी आणि तापासह इतर लक्षणे असलेल्या प्रवाशांची तपासणी करा. तसेच कोविड संशयिताचे नमुने घेऊन त्यांची चाचणी करावी. यासोबतच विदेशातून परतलेल्या लोकांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला द्या. यासाठी आरोग्य विभागाने विदेशातून परतलेल्या लोकांची यादी तयार करावी. 12 ते 14 दिवस त्यांच्या प्रकृतीची पाहणी करा. कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्यांच्यावर उपचार करणे आवश्यक आहे, असे पाठक यांनी अधिक सांगितले.
काळजी घेण्याचा दिला सल्ला
उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक म्हणाले की, चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा धोका पुन्हा वाढला आहे. सावधगिरी बाळगून, आपण कोविडच्या धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करू शकता. गर्दीच्या ठिकाणी विनाकारण जाणे टाळा. शक्यतो मास्क घालूनच बाहेर पडा. याशिवाय जागरूकतेने कोरोनाचा पराभव केला जाऊ शकतो. मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा, यामुळे संसर्गाचा सहज सामना केला जाऊ शकतो, असा सल्लाही उपमुख्यमंत्र्यांनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"