काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांसह पोलीस उपअधीक्षकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 01:53 AM2020-01-13T01:53:24+5:302020-01-13T01:53:42+5:30

एके-४७ रायफली, हातबॉम्ब जप्त; कारवाईमुळे खळबळ

Deputy Superintendent of Police arrested with two terrorists in Kashmir | काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांसह पोलीस उपअधीक्षकाला अटक

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांसह पोलीस उपअधीक्षकाला अटक

Next

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पोलीस उपअधीक्षक देविंदरसिंह यांना हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांसह शनिवारी दुपारी अटक करण्यात आली. ते दहशतवाद्यांसोबत कारने प्रवास करत होते. गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनी देविंदरसिंह यांना राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले होते.

काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील काझीगुंड येथे पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांची नावे नाविद बाबू, असिफ रफ्तार अशी आहेत. नाविदच्या नावावर अनेक गुन्हे दाखल असून, तो तीन वर्षांपूर्वी हिजबूल मुजाहिदीनमध्ये सामील झाला होता, तसेच नाविद बाबू हा माजी पोलीस कर्मचारी आहे.

या तिघांकडून पोलिसांनी दोन एके-४७ रायफली, हातबॉम्ब असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलिसांच्या अपहरणविरोधी पथकामध्ये कार्यरत असलेले पोलीस उपअधीक्षक देविंदरसिंह यांनी नियुक्ती सध्या श्रीनगर विमानतळावर करण्यात आली होती. त्या आधी पोलीस निरीक्षक असताना, त्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल आॅपरेशन ग्रुपमध्ये काम केले होते. दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईमुळे देविंदरसिंह यांना बढती मिळून ते पोलीस उपअधीक्षक झाले होते. बदामीबाग येथील लष्करी छावणीजवळ शिवपोरा येथे देविंदरसिंह राहतात. त्यांनी जम्मूला जाण्याचे कारण दाखवून चार दिवस सुट्टी घेतली होती. 

संसदेवर झालेल्या हल्ल्याशी कनेक्शन
२००१ साली संसदेवर झालेल्या हल्ल्यातील एक आरोपी मोहम्मदला दिल्ली येथे नेण्यासाठी, त्याला भाड्याचा एक फ्लॅट मिळवून देणे, तसेच कार विकत घेऊन देण्यासाठी देविंदरसिंह यांनी मला भाग पाडले होते, असे या प्रकरणातील मुख्य आरोपी अफजल गुरूने तिहार तुरुंगातून आपल्या वकिलाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.

Web Title: Deputy Superintendent of Police arrested with two terrorists in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.