डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमचा थाट, राहायचा बुलेटप्रुफ घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 12:59 PM2017-11-22T12:59:24+5:302017-11-22T13:05:50+5:30
बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असणाऱ्या गुरमीत राम रहीम याच्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयातून अनेक सहस्य समोर आली.
चंदीगड- बलात्कार प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असणाऱ्या गुरमीत राम रहीम याच्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयातून अनेक सहस्य समोर आली. डेरामध्ये असलेल्या विविध गोष्टींनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. राम रहीमला झेड प्लस सुरक्षा तर होतीच पण त्याचबरोबर राम रहीमचं घर 'तेरा वास' हे बुलेटप्रुफ असल्याचं समोर आलं आहे. सिरसातील राम रहीम याच्या तीन मजली इमारतीते तसंच स्वच्छतागृहांचे दरवाजे आणि खिडक्या बुलेटप्रुफ होत्या तसंच एखाद्या राजमहालाप्रमाणे सर्व सोयी-सुविधा तेथे होत्या. गुरमीतच्या ड्रेसिंग रूममध्ये सामान ठेवायला 14 फुट उंचीचे 29 मोठी लाकडी कपाटं होती. सगळ्या खोल्या वातानुकूलित असून तेथे महागड्या फुलदाण्या, मोठमोठे टीव्ही आणि लक्झरी वस्तू होत्या.
पंजाब-हरियाणा हायकोर्टात सादर करण्यासाठी पोलिसांनी तयार केलेल्या रिपोर्टनुसार राम रहीमच्या मालमत्तेवर छापे मारण्यात आले. या छापेमारीत आयात केलेलं पिण्याचं पाणी, मसाज ऑईल, परफ्युम्स, कॉस्मेटीक प्रोडक्ट, शेकडो चपलांचे जोड, टोप्या, डिझायनर कपडे जप्त करण्यात आले. पोलिसांच्या या छापेमारीत पोलिसांना बुलेटप्रुफ लेक्सस (DL8CAB-4587), दोन मोठ्या बॅगांमध्ये 56 हार्ड डिस्क्स, हार्ड डिस्क असलेले सहा प्रोजेक्टर, पेन ड्राइव्ह आणि वॉकी-टॉकीचे सेट्स सापडले.
साध्वीवरील बलात्कार प्रकरणी तुरूंगात असलेल्या राम रहीमच्या या अलिशान घरात मोठे स्टुडिओ, ड्रेसिंग रूम, मुझ्यिअम आणि मीटिंग रूमही आहेत. पोलिसांच्या पथकाला राम रहीमच्या घरातून कुठल्याही स्फोटक वस्तू सापडल्या नाहीत. राम रहीमच्या घरातील पहिला मजल्यावर एक खोली सापडली ती खोली थेटे राम रहीमच्या खोलीला जोडली जाते. या खोलीची खिडकी एका लाकडी कपाटाच्या मागे लपवण्यात आली. तसंच राम रहीमच्या खोलीतून साध्वींच्या हॉस्टेलमध्ये जाण्यासाठी एक भिंत असल्याचं शोध पथकातील एका व्यक्तीने सांगितलं.