"ईश्वराची इच्छा असेल तर..."; गुरमीत राम रहीमचं तुरूंगातून आई, अनुयायांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 12:03 PM2021-01-26T12:03:12+5:302021-01-26T12:05:43+5:30
सोमवारी आयोजित सत्संगमध्ये त्याचं पत्र वाचून दाखवण्यात आलं.
रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यानं आपली आई आणि अनुयायांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यानं लवकरच आपण तुरूंगाबाहेर येऊ अशी अशाही व्यक्त केली आहे. "जर ईश्वराची इच्छा असेल तर आपण लवकरच तुरूंगाबाहेर येऊन आईचे उपचार करू," असंही त्यानं पत्रात नमूद केलंय. सोमवारी डेरामध्ये दुसरे गुरू सतनाम सिंग यांच्या १०२ व्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गुरमीत राम रहीमचं पत्र वाचून दाखवण्यात आलं.
"ईश्वराची इच्छा असेल तर मी लवकरच तुरूंगातून बाहेर येईन आणि आपल्या आईचे उपचार करेन. जेव्हा मी आईला भेटण्यासाठी रुग्णालयात आलो होते तेव्हा तिची प्रकृती गंभीर होती. परंतु मला भेटल्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे," असं गुरमीत राम रहीमनं आपल्या पत्रात म्हटलं आहे. यापूर्वी १३ मार्च २०२० आणि २८ जुलै २०२० रोजी त्यानं आपल्या आईला पत्र लिहिलं होतं.
मोठ्या प्रमाणात अनुयायी सहभागी
डेरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सत्संगच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. डेराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही पोलीस तैनात करण्यात आले होते. सत्संगच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच डेरा अनुयायी त्या ठिकाणी पोहोचण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर त्या ठिकाणी डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम याचं रेकॉर्डेड सत्संग ऐकवण्यात आलं. त्यानंतर डेरातील सेवकानं गुरमीत राम रहीम यानं आपल्या अनुयायांसाठी आणि आपल्या आईसाठी लिहिलेलं पत्र वाचून दाखवण्यात आलं.
"२०२१ हे वर्ष सर्वांसाठी आनंदाचं ठरावं आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण होवो. ईश्वर सर्वांवर आपली कृपादृष्टी ठेवो," असंही त्यानं आपल्या पत्रात लिहिलं होतं. डेरानं दिलेल्या माहितीनुसार हे पत्र त्यानं २३ जानेवारी रोजी लिहिलं होतं.