शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे लोकसभेत उमटले तीव्र पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 09:04 AM2021-12-21T09:04:20+5:302021-12-21T09:05:01+5:30
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये गेल्या आठवड्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जी विटंबना करण्यात आली, त्याचे तीव्र पडसाद लोकसभेत उमटले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये गेल्या आठवड्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जी विटंबना करण्यात आली, त्याचे तीव्र पडसाद सोमवारी लोकसभेत उमटले. शिवसेनेच्या खासदारांनी फलक दाखवून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविला आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली अरविंद सावंत, राजन विचारे, कृपाल तुमाने, प्रताप जाधवसह आदी सदस्यांनी हातात फलक घेऊन बंगळुरूमधील घटनेचा जोरदार निषेध केला. शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करावी, समाजकंटकांना त्वरित अटक करावी, अशी मागणी हे सदस्य करीत होते. मुख्यमंत्री बोम्मई यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.