वाळवंटी नाचू आम्ही- इंद्रजित घुले

By admin | Published: July 18, 2015 02:07 AM2015-07-18T02:07:12+5:302015-07-18T02:07:12+5:30

पंढरीच्या माहेरा अनंत लावण्याची शोभा दाटली आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात जगतजननी कान्हाई, माऊली ज्ञानाई, नामदेव, जनाई या संतांचा मेळा अबिर गुलाल उधळीत टाळ, मृदंगाच्या तालावर दंग झाले.

Desert dance we - Indrajit Ghule | वाळवंटी नाचू आम्ही- इंद्रजित घुले

वाळवंटी नाचू आम्ही- इंद्रजित घुले

Next
ढरीच्या माहेरा अनंत लावण्याची शोभा दाटली आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात जगतजननी कान्हाई, माऊली ज्ञानाई, नामदेव, जनाई या संतांचा मेळा अबिर गुलाल उधळीत टाळ, मृदंगाच्या तालावर दंग झाले.
वाळवंटी नाचू आम्ही ।
वाळवंटी गाऊ ।
असा अभंग गाणार्‍या संत मंडळींच्या वाणीचा रंग हा प्रज्ञेचा आहे. या रंगात रंगून समता, सहिष्णूता, सद्भाव आणि वैज्ञानिक विवेकाचा ध्वज घेऊन आषाढी वारीत अवघी पंढरी दुमदुमून जाते : संत सोयराबाई म्हणतात,
अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ।
मी तू पण गेले वाया । पाहता पंढरीचा राया ।
यातील मी तू पण वाया जावं, अहंकाराची पिसं गळून पडावीत आणि माणसामाणसातील अंतर कमी व्हावं या जाणिवेची ही पंढरी आहे. मानवतेच्या उपासनेची पताका पंढरीपासून पंजाबमधील घुमानपर्यंत नेणार्‍या संत नामदेवांनी पंढरीच्या याच वाळवंटात भक्ती चळवळ उभी केली. श्रद्धा आणि भक्तीच्या तीरावरील लोकजीवनाला, महाराष्ट्र देशाच्या या मातीत कर्मकांडाविरुद्ध बंड पुकारून क्रांतीदर्शी तत्त्वज्ञान, प्रतिभासंपन्न विचार आणि प्रभावी नीतीशिक्षणाचे धडे या चळवळीने दिले. सोप्या आणि सर्वश्रेष्ठ भक्तीची शिकवण दिली. कर्मकांड, योगयाग, हवन, तीर्थाटन, देवीदेवतांचे पूजन यापेक्षा विचारांचा गजर आणि विचारांचाच जागर हा वाळवंटातील श्रद्धेचा महिमा आहे.
वारकर्‍यांचीच नाही तर अवघ्या समाजाची मनोभूमी नांगरूण, रुढ संकेतांच्या, दांभिकपणाच्या आणि अंधश्रद्धेच्या विरोधात प्रखर लढा दिला. हा लढा स्वत:च्या अस्तित्वाचा आणि आत्माविष्काराचाही होता. म्हणूनच हा लढा देताना शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू असे संत तुकाराम म्हणतात.
या शब्दधनातून अत्यंत साध्या सहज पद्धतीने संतांनी भक्ती, करुणा, शांत रसाचा उत्कट आविष्कार केला. कुणाही जीवाचा न घडो मत्सर हे नीतितत्त्व जपले.
दया करणे जे पुत्रासी
ते चि दास आणि दासी
असं म्हणताना संत तुकारामांनी समानता आणि दयेचे अतिउच्च शिखर गाठताना सांगितले,
मुंगी आणि राव । आम्हा सारखाच जीव
हा वैश्विकतेचा संदेश दिला.
नव्या युगाच्या उंबरठ्यावर पुत्र प्राप्तीसाठी गर्भजल परीक्षण, नवस करणार्‍यांसाठी, वास्तूदोष निवारणासाठी घरे पाडणार्‍यांसाठी, भोळ्या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन नको तिथं लोंबकळत राहणार्‍यांना हा संत विचार आजही उपकारकच आहे. दशदिशा मंगळ आहेत हे समजावून दिले, त्याही पुढे तुकोबारायांनी या आंधळ्या जनांसमोर
नवसे सायासे पुत्र होती
मग का करणे लागे पती
हा विज्ञाननिष्ठ प्रश्नही उभा केला आहे. विज्ञाननिष्ठांची ही मांदियाळी या वाळवंटात आत्मानुभूतीच्या तालावर आत्मविष्काराच्या धुंदीत नाचू कीर्तनाचे रंगी म्हणते. या जगी ज्ञानदीप लावणार्‍या संत मेळ्याने सकलांची दृष्टी निदार्ेष होवो. डोळसपणा येवो हेच पसायदान मागितले. अजाणतेपणाकडून सर्व ज्ञानाचे दान देणारी ही वारी आजही
देव घालावे परते
संत पुजावे आरते
असंच सांगत आली आहे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल म्हणणार्‍या एकनाथांनी स्वदेहातील पंढरीचा आणि विठ्ठल आत्म्याचा साक्षात्कार घडवून दिला. एकमेकांच्या देहातील हा विठ्ठल पूजताना या वाळवंटात एकमेकांच्या पायी दंडवत घालून मानवतेचा सवार्ेच्च जयघोष केला. संतांच्या या दृष्टीने आत्मज्ञानाची कवाडे आपल्यासाठी उघडून ठेवली आहेत. अभंगाच्या चंद्रभागेत बुडून शब्दाआशयाचे स्नान उरकून भावार्थाला प्रदक्षिणा घातली की संतवाणीला अपेक्षित वारी पूर्ण होते.
बाराव्या शतकापासून आजपावेतो संत वाणीच्या या भक्तिगंगेला आषाढी दिवशी महापूर येतो. या भक्तिगंगेच्या वाळवंटात अभंग, गवळणी, भारूड, कीर्तनाच्या आविष्काराने समाजाच्या चैतन्याची पालवी फुलवत ठेवली आहे. अंत:करणाच्या वाळवंटात ग्यानबा तुकारामाच्या नामघोषाने आपल्यातील माणुसपणाची प्रेमभक्ती, प्रेमशक्ती जेव्हा दुमदुमते तेव्हा देहाच्या पंढरीत टाळ मृदंग निनादत राहतात. ही वारी संत विचारांची आहे, विज्ञाननिष्ठ उजेडाची वारी आहे. सकलांच्या कल्याणाचा हाच खरा मार्ग आहे. या वाटेवर लोटांगण घालता आले पाहिजे.

इंद्रजित घुले
मंगळवेढा
९०२८८४७६२८, ९४२३०६०११२

Web Title: Desert dance we - Indrajit Ghule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.