पळपुट्या एनआरआय नवऱ्यांनो सावधान! तुमची संपत्ती, पासपोर्ट जप्त होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 01:43 PM2018-06-14T13:43:34+5:302018-06-14T13:43:34+5:30
कोर्टाच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्यास तात्काळ कारवाई करण्याची सूचना
नवी दिल्ली- भारतीय मुलीची लग्नानंतर फसवणूक करुन परदेशात निघून जाणाऱ्या एनआरआय लखोबांना आता सरकारने चांगलाच दणका द्यायचे ठरवले आहे. कोर्टाच्या समन्सकडे दुर्लक्ष करून परदेशात निवांत जगणाऱ्या या नवरोबांचे पासपोर्ट रद्द करण्याचा व संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
भारतामध्ये विशेषतः पंजाबमध्ये अनेक महिलांची या एनआरआय नवऱ्यांनी फसवणूक केली आहे. उच्चप्रतीच्या जीवनपद्धतीचे आमिष दाखवून मुलींशी लग्न करायचे आणि काही काळानंतर त्यांना भारतातच सोडून जायचे किंवा परदेशात त्यांचा छळ करायचा असे प्रकार या लोकांकडून घडले आहेत. या महिलांना दिलासा देण्यासाठी भारतातील मंत्र्यांच्या गटाने काही नवे उपाय सुचवले आहेत. त्यामध्येच पारपत्र रद्द करणे, संपत्ती जप्त करणे अशा सूचनांचा समावेश आहे.
मंत्रिगटाने सुचवलेल्या उपायांमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रकरणे हाताळण्यासाठी तसेच कोर्टाच्या समन्सला दखल न घेणाऱ्या नवऱ्यांची प्रकरणे पाहाणारे वेगळे संकेतस्थळ तयार करावे अशा सूचनेचाही समावेश आहे. जर समन्सला उत्तर देण्यास नवऱ्याने नकार दिला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. जे लोक महिलांना फसवून परदेशात जातात, तिकडे नाव बदलून राहातात त्यांच्यासंदर्भातील प्रकरणेही या संकेतस्थळावर हाताळली जातील. एनआरआय नवऱ्याशी लग्न केल्यावर त्याची नोंदणी 48 तासांच्या आत करण्याची सूचनाही करण्यात आलेली आहे. या मंत्रिगटामध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, महिला बालकल्याण विकास मंत्री मेनका गांधी, कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यासारखे वरिष्ठ मंत्री आहेत. राजनाथ सिंह यांनी या मंत्रिगटाचे नेतृत्त्व केले.