चंद्राला कवेत घेण्याची इच्छा अधिकच प्रबळ झाली - पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 02:41 AM2019-09-08T02:41:27+5:302019-09-08T02:41:46+5:30
शास्त्रज्ञांचे केले कौतुक, विज्ञानात अपयश नव्हे, तर प्रयोग असतात; अवघा भारत तुमच्या पाठीशी
बंगळुरू : चांद्रयान २ मोहिमेला अपेक्षित यश न मिळाल्याने इस्रोमधील साऱ्या शास्त्रज्ञांचे काहीसे चेहरे पडले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शास्त्रज्ञांचे तोंड भरून कौतुक केले. विज्ञानात अपयश नसते, असतात ते प्रयोग आणि प्रयत्न. कधीही पराभव मानणाºया संस्कृतीचे इस्रोने जतन केले आहे, त्यामुळे केवळ मीच नव्हे, तर सारा भारत आणि सर्व भारतीय तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, आपण भविष्यात नक्कीच यशस्वी होऊ , अशा शब्दांत पंतप्रधानांनी पुढील मोहिमांसाठी या शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या.
चांद्रयान-२ चा अंतिम निकाल आपणा सर्वांच्या अपेक्षेनुसार आला नाही, मात्र चांद्रयानाचा प्रवास अतिशय उत्तम होता, असे सांगतानाच, या मोहिमेमुळे चंद्राला आपल्या कवेमध्ये घेण्याची इच्छा अधिक प्रबळ झाली असल्याचे प्रतिपादनही पंतप्रधानांनी केले. इस्रोच्या सेंटरमधून मोदी यांनी केलेले भाषण शास्त्रज्ञांना उद्देशून असले तरी त्यातून भारतीयांच्या मनातील अपयशाची भावनाही त्यांनी पुसून टाकली. त्यामुळे मोदी यांच्या भाषणानंतर देशभरातून इस्रो व त्यातील शास्त्रज्ञांना शाबासकी देणाºया व त्यांचे कौतुक करणाºया प्रतिक्रिया येऊ लागल्या.
तुम्ही अजिबात निराश होऊ नका, अवघा भारत तुमच्या पाठिशी आहे, तुम्ही केवळ चांद्रयान-२ मोहिमेसाठीच नव्हे, तर जगात भारताची मान ताठपणे उंचावण्यासाठी मोठे योगदान दिले आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, चांद्रयान-२ मोहिमेसाठी तुम्ही घेतलेले परिश्रम सर्वांनी पाहिले आहेत. तुम्ही अगदी झपाटल्याप्रमाणे रात्रन्दिवस काम करीत होता. त्यामुळे कदाचित आपला वेग काही काळासाठी कमी झाला असला तरी तो थांबलेला नाही आणि तुम्ही तो थांबू देणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे.
इस्रोप्रमुखांच्या डोळ्यांत अश्रू तरळले
या भाषणानंतर सर्व शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी पंतप्रधान इस्रोच्या नियंत्रण कक्षात आले आणि प्रत्येकाचा हात हातात घेत त्यांना शुभच्छा दिल्या आणि त्यांचे कौतुकही केले. त्यावेळी सारेच शास्त्रज्ञ काहीसे भावनाविवश झाले आहे. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांना तर त्या क्षणी आपल्या भावना आवरताच आल्या नाहीत. मोदी यांनी त्यांना मिठी मारून त्यांच्या पाठीवरून अनेकदा हात फिरवला. त्याप्रसंगी सिवन यांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. ते पाहून सारे शास्त्रज्ञही सद्गदित झाले होते.
चांद्रयान-२ मोहिमेचा अंतिम टप्पा पाहण्यासाठी देशभरातून अनेक शाळकरी विद्यार्थी इस्रोमध्ये आले होते. त्या सर्वांना तो क्षण पाहण्याची इच्छा होती. प्रत्यक्षात तसे न घडल्याने तेही काहीसे हिरमुसले झाले होते. पंतप्रधान मोदी यांनी या मुलांचीही भेट घेतली आणि त्यांच्याशी काही मिनिटे गप्पा मारल्या.
त्यावेळी एका मुलाने मला अंतराळवीर होण्याची इच्छा असल्याचे सांगताच, मोदी यांनी त्याला शाबासकी दिली. एका विद्यार्थ्याने आपणास राष्ट्रपती होण्याची इच्छा असल्याचे सांगितले, तेव्हा मोदी यांनी ‘पंतप्रधान व्हायचे नाही का?’असा प्रश्न गमतीने केला. त्यावर सर्वांनाच हसू फुटले. यात काही विद्यार्थी भूतानचेही होते. पंतप्रधानांनी त्यांना इतर मुलांशी मैत्री झाली की नाही, असा प्रश्नही केला.