जम्मू-काश्मीरचे राज्यपाल व्होरांची राजीनाम्याची इच्छा
By admin | Published: June 27, 2017 02:32 AM2017-06-27T02:32:09+5:302017-06-27T02:32:09+5:30
एन. एन. व्होरा यांनी तणावग्रस्त जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली.
हरीश गुप्ता ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : एन. एन. व्होरा यांनी तणावग्रस्त जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्याहून परतल्यानंतर लगेचच नव्या राज्यपालांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्होरा यांनी गेल्या महिन्यातच पंतप्रधानांना भेटून राज्यपालपदी काही काळ राहण्यास असमर्थता व्यक्त केली होती. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात जून २00८ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची मुदत संपून बराच काळ लोटल्यावरही ते त्या पदी कायम होते. त्यांच्या नऊ वर्षांच्या काळात काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.
व्होरा यांच्या जागी नवीन राज्यपालाची नियुक्ती करण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने तयारी सुरू केली आहे. त्या पदासाठी केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी यांचे नाव सध्या पुढे आहे. साऊथ ब्लॉकमधील सूत्रांच्या मते लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांच्या नावाचीही चर्चा आहे. काश्मीरमध्ये आतापर्यंत १२ राज्यपाल झाले असून, त्यापैकी एकही अल्पसंख्याक समाजातील नव्हता. काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता लेफ्ट. जनरल हसनैन यांची नेमणूक होण्याची शक्यता अधिक आहे. लेफ्ट. जनरल हसनैन यांनी २0१0-११ या काळात जनरल आॅफिसर कमांडिंग म्हणून काश्मीरमध्ये काम केले आहे.