वडिल बँकेत मॅनेजर असूनही तो राजकारणी, नोकरशहांच्या घरात करायचा चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 02:59 PM2017-08-22T14:59:16+5:302017-08-22T15:11:16+5:30
काही जणांना नाईलाजाने परिस्थितीमुळे चोरीचा मार्ग पत्करावा लागतो तर, काहीजण आपले महागडे शौक पुरे करण्यासाठी चो-या, लुटमारी करतात.
नवी दिल्ली, दि. 22 - काही जणांना नाईलाजाने परिस्थितीमुळे चोरीचा मार्ग पत्करावा लागतो तर, काहीजण आपले महागडे शौक पुरे करण्यासाठी चो-या, लुटमारी करतात. दिल्ली पोलिसांनी अशाच एका हायप्रोफाईल चोराला अटक केली आहे. सिद्धार्थ मेहरोत्रा असे आरोपीचे नाव असून तो पेशाने ग्राफीक डिझायनर आहे. सिद्धार्थचे वडिल बँकेत मॅनेजर आहेत. सिद्धार्थ दिवसा सर्वांना आपला श्रीमंती थाट दाखवायचा. त्याची आलिशान कार, महागडया वस्तू पाहिल्यानंतर सिद्धार्थ कुठल्या तरी गर्भश्रीमंताचा मुलगा आहे असे समोरच्याला वाटायचे. पण खरतर सिद्धार्थ त्याची ही खोटी श्रीमंती दाखवण्यासाठी दिल्लीतील नेते, नोकरशहा, अधिकारी आणि व्यावसायिकांच्या घरात चो-या करत होता.
सिद्धार्थ उच्चभ्रूंच्या वस्तीला लक्ष्य करत होता. आधी तो तिथे जाऊन सर्व पाहणी करायचा. बंगल्याचा सुरक्षारक्षक आणि बंगल्याच्या आत राहणा-या लोकांमध्ये इंटरकॉमची सुविधा नसल्याचे जेव्हा त्याच्या लक्षात आले. तेव्हा सिद्धार्थने अशा घरांमध्ये चोरी सुरु केली. सिद्धार्थ आणि त्याचा सहकारी अनुराग सिंह ज्या घरात चोरी करायचीय तिथपासून काही अंतरावर गाडी उभी करायचे. सिद्धार्थ दरवाजावरची बेल वाजवल्यानंतर लपून बसायचा कोणी दरवाजा उघडतोय का ? हे तपासण्यासाठी तो असे करायचा. जर कोणी दरवाजा उघडला नाही तर, त्या घरात कोणी नाही हे स्पष्ट व्हायचे. त्यानंतर सिद्धार्थ अशा घरात घुसून चो-या करायचा. त्यावेळी त्याचा साथीदार बाहेर थांबून लक्ष ठेवायचा.
जानेवारीपासून दक्षिण दिल्लीत उच्चभ्रूवस्तीमध्ये चोरी, लुटमारीच्या घटना वाढल्यामुळे दिल्ली पोलिसांनी टीम बनवली. या टीमने काही छापेदेखील मारले पण त्यातून फार काही हाती लागले नाही. त्यानंतर पोलिसांनी फेसबुकवर शोध सुरु केला. त्यावेळी घरफोडीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या व्यक्तीबरोबर सिद्धार्थची शरीरयष्टी मिळत होती. पोलिसांनी सिद्धार्थचे फेसबुक अकाऊंट तपासले तेव्हा त्याची हायप्रोफाईल लाईफस्टाईल दिसून आली. त्यावरुन पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी सिद्धार्थला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. जितेंदर आणि अनुराग सिंह या दोघांच्या मदतीने आपण घरफोडी करायचा असे त्याने सांगितले. लाल किल्ल्याजवळून त्याला अटक करण्यात आली. जितेंदर सिद्धार्थकडून चोरीच्या वस्तू विकत घ्यायचा.