५ वेळा नसबंदी तरीही अडीच वर्षात २५ वेळा प्रेग्नेंट; महिलेचा कारनामा, सरकारलाच गंडवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:01 IST2025-04-09T12:00:39+5:302025-04-09T12:01:25+5:30
ऑडिट टीमने हा प्रकार उघडकीस आणताच मुख्य आरोग्य अधिकारी अरुण श्रीवास्तव हॉस्पिटलला पोहचले आणि त्यांनी या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले.

५ वेळा नसबंदी तरीही अडीच वर्षात २५ वेळा प्रेग्नेंट; महिलेचा कारनामा, सरकारलाच गंडवलं
आग्रा - उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका महिलेची ५ वेळा नसबंदी करण्यात आली तरीही अडीच वर्षात ती २५ वेळा प्रेग्नेंट झाली आहे. हे ऐकून तुम्हाला अजब वाटलं असेल ना...परंतु उत्तर प्रदेशातील आग्रा येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. ज्याचं सत्य समोर येताच प्रशासन खडबडून जागं झाले आहे.
आरोग्य विभागाने फतेहाबादच्या सीएचसी हॉस्पिटलचं ऑडिट केले. या ऑडिटवेळी पथकानं जसजशी डॉक्युमेंट पडताळणी केली तेव्हा अधिकारीही हैराण झाले. एकाच महिलेच्या नावावर २५ वेळा प्रेग्नेंसी आणि ५ वेळा नसबंदी करण्यात आली. इतकेच नाही तर या महिलेच्या खात्यात सरकारकडून ४५ हजार रुपयेही ट्रान्सफर करण्यात आलेत. ऑडिट टीमने हा प्रकार उघडकीस आणताच मुख्य आरोग्य अधिकारी अरुण श्रीवास्तव हॉस्पिटलला पोहचले आणि त्यांनी या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले.
ही तांत्रिक चूक आहे की कर्मचाऱ्यांनी मिळून केलेला कोणता घोटाळा आहे याची तपासणी करावी. जर या प्रकारात कुणी दोषी आढळलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई करू असं अरुण श्रीवास्तव यांनी म्हटलं. राज्य सरकार २ प्रमुख योजना चालवते. त्यात जननी सुरक्षा योजना आणि महिला नसबंदी प्रोत्साहन योजना, या योजनेतंर्गत प्रसुतीनंतर महिलांना १४०० रुपये आणि आशासेविकाला ६०० रुपये दिले जातात तर नसबंदी करणाऱ्या महिलेला २ हजार आणि आशासेविकेला ३०० रुपये मिळतात. ही पूर्ण रक्कम महिलेच्या खात्यात ४८ तासांत ट्रान्सफर केली जाते. या दोन्ही योजनेत हेराफेरी झालीय का याचा शोध आता घेतला जात आहे.
दरम्यान, फतेहाबाद, शमशाबाद येथील हॉस्पिटलमध्ये गेल्या काही वर्षापासून काही कर्मचाऱ्यांचा दबदबा आहे. त्यामुळेच इथं एका वर्षात ४ अधीक्षकांची बदली झाली परंतु दबदबा अजूनही कायम आहे. योजनेतील रक्कम लाभार्थ्यांना देण्यासाठी दबाव बनवला जातो. त्यातूनच हे प्रकार समोर येतात. या प्रकाराचं गांभीर्य ओळखून विशेष तपास समिती बनवण्यात आली आहे. अखेर ही चूक तांत्रिक आहे की काही घोटाळा आहे हे तपासले जाईल असं मुख्य आरोग्य अधिकारी अरुण श्रीवास्तव यांनी म्हटलं.