..म्हणून आठवड्याभरापासून वाढत नाहीयेत पेट्रोल-डिझेलचे दर; ही आहे 'राज की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 11:03 AM2018-05-02T11:03:31+5:302018-05-02T11:03:31+5:30
24 एप्रिलपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेले नाहीत
नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे देशभरातील जनतेला महागाईपासून दिलासा मिळताना दिसतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होऊनही गेल्या काही दिवसांमध्ये देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेले नाहीत. कर्नाटक विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन इंधन दरवाढ केली जात नसल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
24 एप्रिलपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेले नाहीत. मात्र याच कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅलर 2 डॉलरनं वाढलीय. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांनुसार देशातील पेट्रोल, डिझेलचे दर ठरतात. गेल्या वर्षीच्या जून महिन्यापासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात. एप्रिल महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं गेल्या 55 महिन्यांमधील उच्चांक गाठला होता. पेट्रोल 74.63 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 65.93 रुपये प्रति लिटरवर जाऊन पोहोचलं होतं.
24 एप्रिलपासून देशातील पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. 24 एप्रिलला आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचा प्रति बॅरलसाठीचा दर 78.84 डॉलर इतका होता. तेव्हा भारतातील इंधन कंपन्यांनी दर वाढ केली होती. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचा दर 80.56 डॉलर प्रति लिटर आहे. यासोबतच डिझेलची किंमतही 84.68 डॉलर प्रति बॅरलवरुन 86.35 डॉलरवर पोहोचलीय. या काळात भारतीय रुपयाच्या मूल्यातही घसरण झालीय.