मुस्लिम असूनही कलाम हे खरे राष्ट्रभक्त - महेश शर्मा
By Admin | Published: September 18, 2015 08:57 PM2015-09-18T20:57:51+5:302015-09-18T20:58:04+5:30
एपीजे अब्दुल कलाम हे मुस्लिम असून एक महान राष्ट्रभक्त आणि मानवतावादी व्यक्ती होते असे विधान केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी केले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - एपीजे अब्दुल कलाम हे मुस्लिम असून एक महान राष्ट्रभक्त आणि मानवतावादी व्यक्ती होते असे विधान केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी केले आहे. मात्र शर्मा यांच्या विधानाने नवीन वाद निर्माण झाला असून मुसलमानांच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्न उपस्थित करण्याचा हक्क महेश शर्मा यांना कोणी दिला असा सवाल एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी विचारला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्याचे कौतुक केले. मुस्लिम असूनसुद्धा कलाम हे एक खरे राष्ट्रभक्त होते. दिल्लीतील औरंगजेब रोडला त्यांचे नाव देण्याचा निर्णय योग्यच होता, कलाम यांचे कार्य देशासाठी तरुणांसाठी प्रेरणादायीच आहे असे त्यांनी म्हटले आहे. कलाम यांच्या कार्याचा गौरव करताना महेश शर्मा यांनी 'मुस्लिमसुद्धा' असा शब्दप्रयोग केल्याने त्यावर नाराजी व्यक्त होत आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सवरही शर्मा यांच्यावर टीका होत असून मुस्लिम व्यक्ती देशभक्त नसते का असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे. महेश शर्मा यांनी केलेले विधान दुर्दैवी असून मोदी त्यांना मंत्रिमंडळात ठेवतील का असा प्रश्न असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला.