पेट्रोल-डिझेल भाववाढ होऊनही इंडियन आॅइलचा नफा १५ हजार कोटींनी घटला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 07:13 AM2020-06-27T07:13:00+5:302020-06-27T07:15:01+5:30
भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन आॅइल या भारतातील तीन मोठ्या कंपन्या आहेत.
विशाल शिर्के
पिंपरी : आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅइलच्या दरातील चढ-उतार, डॉलरच्या तुलनेतील रुपयाचे अवमूल्यन कारणांमुळे इंडियन आॅईलचा नफा २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये तब्बल १५ हजार ५८१ कोटी रुपयांनी घटून तेराशे कोटी रुपयांपर्यंत घसरला आहे. चौथ्या तिमाहीअखेर पाच हजार कोटींचा तोटा झाल्याचे इंडियन आॅइल कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
कंपनीने गेल्या आर्थिक वर्षातील ताळेबंद जाहीर केला आहे. लॉकडाऊनमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड आॅइलचे दर शून्यावर गेले होते. त्यावेळीदेखील देशातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी झाले नव्हते. उलट घटलेल्या महसुली उत्पादनाची तूट भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने करवाढ केली असून, पेट्रोलियम कंपन्या १ जूनपासून दररोज इंधानाच्या भावात वाढ करीत आहे. त्याचा प्रभाव जून २०२० पर्यंत संपणाºया तिमाहीच्या ताळेबंदमध्ये जाणवेल.
भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन आॅइल या भारतातील तीन मोठ्या कंपन्या आहेत. इंडियन आॅइलचा भांडवली बाजारातील वाटा सुमारे पन्नास टक्के आहे. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात ८९.९६९ दशलक्ष टन पेट्रोलियम पदार्थांची विक्री केली. ८१.७१ दशलक्ष टन देशांतर्गत खप आहे. यातून ५ लाख ६६ हजार रुपयांचे महसुली उत्पन्न मिळविले आहे. गेल्या वषीर्पेक्षा ३८ हजार ९८२ कोटी रुपयांची घट आहे. निव्वळ नफ्यात १५ हजार ५८१ कोटींनी घट झाली आहे. गेल्या वर्षी क्रूड खरेदीदर आणि विक्री दरामध्ये कमी तफावत असल्याने आणि अधिक परदेशी चलन खर्ची पडल्याने नफ्यात मोठी घट झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या अवमूल्यन या प्रमुख कारणांसह इतर घटकांमुळे २०१९-२० या काळात तब्बल ४,१४५.५३ कोटी रुपयांचा तोटा झाला. त्यापूर्वीच्या (२०१८-१९) वर्षात हा तोटा १,७४०.९४ कोटी रुपये होता.
कंपनीचा निव्वळ नफा (कोटींमध्ये)
२०१७-१८ २१,३४६
२०१८-१९ १६,८९४
२०१९-२० १,३१३
असा होतो इंधन आणि दर प्रवास
क्रूड आॅइल जहाजामधून रिफायनरी कंपनीमध्ये पोहचल्ली प्रक्रिया होण्यासाठी ४५ ते ६५ दिवसांचा कालावधी लागतो. क्रूड आॅइलच्या किंमती दररोज बदलत असतात. रिफायनरी दरातील तफावत २०१९-२० या आर्थिक वर्षात प्रतिबॅरल ०.०८ डॉलर होती. तर, २०१८-१९ मध्ये हीच तफावत ५.४१ डॉलर होती. त्यामुळे त्या आर्थिक वर्षात कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाली. तर, यंदा नफा मोठ्या प्रमाणावर घटला.