अश्रुधुरांचा मारा, तरी शेतकरी ठाम; दिल्लीत संघटनांच्या बैठका निष्फळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 07:42 AM2024-02-17T07:42:14+5:302024-02-17T07:42:56+5:30
मागे हटण्यास नकार; बैठका निष्फळ
चंडीगड : हरयाणा पोलिसांनी शुक्रवारी आंदोलक शेतकरी अंबालाजवळील शंभू सीमेवर बॅरिकेडच्या दिशेने जात असताना त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. एका वृद्ध शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने आंदोलनादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, तीन केंद्रीय मंत्र्यांनी आंदोलक संघटनांच्या नेत्यांशी बुधवारी उशिरा रात्रीपर्यंत केलेली चर्चाही निष्फळ ठरल्याने आता हा तिढा सोडवण्यासाठी रविवारी पुन्हा चर्चा होणार आहे.
पंजाबचे आंदोलक शेतकरीहरयाणाच्या सीमेवर असलेल्या शंभू आणि खनौरी या दोन ठिकाणी अडकले आहेत. आंदोलनाच्या पहिल्या दोन दिवसांतही शेतकरी आणि हरयाणा पोलिस कर्मचारी यांच्यात झटापट झाली होती. हरयाणातील अंबालाजवळील शंभू सीमेवर आंदोलन करणारे ६३ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ग्यान सिंग यांना छातीत दुखत होते. त्यांना सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आणखी एका शेतकऱ्याचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला.
पाच तास चालली बैठक, पण...
शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्यातील चर्चेची पाच तास चाललेली तिसरी फेरी गुरुवारी रात्री उशिरा अनिर्णीत राहिली आणि आता दोन्ही बाजूंमधील बैठकीची पुढील फेरी १८ फेब्रुवारीला होणार आहे. यापूर्वी ८ आणि १२ फेब्रुवारीला चर्चा झाली होती तीही अनिर्णीत
राहिली होती.
‘भारत बंद’ला प्रतिसाद
संयुक्त किसान मोर्चाच्या ‘भारत बंद’च्या आवाहनाला पंजाबमध्ये काही भागात प्रतिसाद मिळाला. बसगाड्या रस्त्यातच थांबल्याने प्रवाशांची शुक्रवारी गैरसोय झाली. उत्तर प्रदेशच्या काही भागांत निदर्शने झाली. दिवसभरात पंजाबमध्ये अनेक ठिकाणी शेतकरी एसकेएमच्या बॅनरखाली निदर्शनेही करण्यात आली.
पोलिस ‘हाय अलर्टवर’
‘भारत बंद’च्या हाकेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस ‘हाय अलर्ट’वर आहेत. सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. राष्ट्रीय राजधानीत अनेक भागांत बॅरिकेड्स लावण्यात आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.