लक्षद्वीप समुहातील जैवसमृद्ध बेट विदारणामुळे झाले नष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 11:58 AM2017-09-08T11:58:14+5:302017-09-08T12:03:57+5:30
अरबी समुद्रातील लक्षद्वीप समुहातील पराली 1 हे बेट सततच्या विदारणामुळे संपुर्णपणे पाण्याखाली गेले आहे. या बेटावर मानवी वस्ती नसली तरी हे प्रवाळ द्वीप जैवविविधतेने समृद्ध होते.
मुंबई, दि.8- अरबी समुद्रातील लक्षद्वीप समुहातील पराली 1 हे बेट सततच्या विदारणामुळे संपुर्णपणे पाण्याखाली गेले आहे. या बेटावर मानवी वस्ती नसली तरी हे प्रवाळ द्वीप जैवविविधतेने समृद्ध होते. आर.एम. हिदायतुल्ला यांनी केलेल्या अभ्यासातून हे बेट आता पूर्णतः पाण्याखाली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. 1968 साली हे बेट 0.032 चौकिमी इतक्या आकारमानाचे होते तसेच ते बेट बंगारम प्रवाळद्विपाचा एक भाग होते असे हिदायतुल्ला यांनी आपल्या अभ्यास अहवालात लिहिले आहे. आता ते 100 टक्के पाण्याखाली गेले आहे.
हिदायतुल्ला हे लक्षद्वीपच्या अॅंड्रोथ येथील राहणारे असून जुलै महिन्यामध्ये त्यांनी कालिकत विद्यापिठात पी.एचडी पदवी संपादित केली आहे. सागरी लाटांच्या विदारणामुळे लक्षद्वीपमधील जैवसमृद्ध बेटांवर होणारा परिणाम असा त्यांच्या अभ्यासाचा विषयच आहे. हिदायतुल्ला यांनी सागरी विदारणाचा अभ्यास करण्यासाठी लक्षद्वीपमधील बंगारम, थिन्नकारा,पराली1, पराली2, पराली 3 या बेटांती निवड केली होती. यामध्ये या पाचही बेटांवर सागरी विदारणाचा मोठा परिणाम होत असल्याचे हिदायतुल्ला यांच्या लक्षात आले. तसेच पराली हे बेट संपुर्ण पाण्याखाली गेल्याच्या निष्कर्षापर्यंत ते पोहोचले. सागरी विदारणाचा बेटांवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी त्यांनी रिमोट सेन्सिंग आणि जीआयएसचाही वापर केला.
या अभ्यासामधून पुढील विदारण प्रक्रिया रोखण्यासाठी आताच उपाय शोधण्याची गरज असल्याचे लक्षात आले असे हिदायतुल्ला यांनी म्हटले आहे. या बेटांचे किनारे वाचवण्यासाठी मॅन्ग्रोव्ह तसेच इतर उपायांची योजना कितपत यशस्वी होईल याचाही विचार केला पाहिजे असे हिदायतुल्ला यांनी म्हटले आहे. या अभ्यासासाठी त्यांना मार्गदर्शन करणारे सी.सी. हरिलाल यांनी परळी 1 बेट पाण्याखाली जात असल्याचे 2011 साली बंगारामला दिलेल्या भेटीत आपल्या लक्षात आले होते असे म्हटले आहे.